टीम AM : बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचा वाढदिवस. रेखा यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 ला झाला. दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेते जेमिनी गणेशन आणि पुष्पवल्ली यांची मुलगी असलेल्या रेखा या गेल्या चाळीस वर्षांहूनही अधिक काळ बॉलीवूडमध्ये असून त्या अगदी सुरुवातीपासूनच आश्वासक अभिनेत्री म्हणून ओळखल्या गेल्या आहेत. रेखा यांचे मुळ नाव भानुरेखा गणेशन पण सिने सृष्टीसाठी त्यांनी रेखा हे नाव धारण केले.
1970 मध्ये आलेला ‘सावन भादो’ हा त्यांचा पहिलाच चित्रपट अगदी लोकप्रिय ठरला होता. त्यानंतर ‘नमक हराम’, ‘धर्मा’, ‘कहानी किस्मत की’ आणि ‘प्राण जाए पर वचन ना जाए’ यासारखे कित्येक हीट चित्रपट त्यांनी दिले. ‘दो अंजाने’ या चित्रपटात त्यांनी महत्वाकांक्षेसाठी आपल्या प्रेमाची तिलांजली देणाऱ्या पत्नीची साकारलेली भूमिका प्रेक्षकांना वेगळा आनंद देऊन गेली.
गुलजार यांच्या ‘घर’ मध्ये एक प्रगल्भ रेखा पाहायला मिळाली. त्यानंतर त्या भारतीय प्रेक्षकांचे मन जिंकत गेल्या आणि शेवटी बॉक्स ऑफिस ‘क्वीन’ म्हणूनच ओळखल्या जाऊ लागल्या. ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘खुबसुरत’, ‘जुदाई’, ‘माँग भरो सजना’, ‘एक ही भूल’ यासारखे त्यांचे चित्रपट हीट ठरले होते.
यश चोप्रा यांचा ‘सिलसिला’ आणि मुजफ्फर अल यांचा ‘उमराव जान’ ने त्यांचे आगळ्या प्रतिमेवर शिक्कामोर्तब केले. रेखा यांनी भारतीय चित्रपट इतिहासाला सुवर्णक्षणांचे संचित बनवले आहे. त्यांनी ‘फटाकडी’ या मराठी सिनेमात सुद्धा काम केले आहे. रेखा या आपल्या फिगर आणि फिटनेससाठी नावाजली जातात. त्या भारताच्या फार लोकप्रिय ग्लॅमर आयकॉन ठरल्या आहेत. त्यांना अस्सल ‘मेकओव्हर क्वीन’ म्हणूनच ओळखले गेले.
40 वर्षात त्यांचे 180 हून जादा सिनेमे आले. रेखा यांना 5 ‘फिल्मफेअर’ व ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाले आहेत. त्या खासदार पण आहेत. त्यांच्या चाहत्यांसाठी रेखा अजून तेवढीच ‘खुबसुरत’ आहे.1973 मध्ये रेखा यांनी विनोद मेहरा यांच्याशी गुपचूप केलेलं लग्न दोघांनी नाकारलं, पण 90 – 91 मध्ये मुकेश अगरवालशी केलेलं लग्न अवघे 14 महिन्यात संपले.
शब्दांकन : संजीव वेलणकर