‘डॉयलॉग’ चे बेताज बादशहा राजकुमार : चित्रपटासाठी नोकरीचा दिला होता राजीनामा

टीम AM : ‘डॉयलॉग’ चे बेताज बादशहा अभिनेता राजकुमार यांचा आज जन्मदिन आहे. राजकुमार यांचा जन्म. 8 ऑक्टोबर 1926 ला बलुचिस्तान येथे झाला. त्यांचे मुळ नाव कुलभूषण पंडीत होते. राजकुमार यांची ओळख विशिष्ट शैलीतील संवादफेक गोष्टींसाठी म्हणून अधोरेखित झाली.

मुंबईतील इन्स्पेक्टरच्या नोकरीचा राजीनामा देऊन राजकुमार यांनी चित्रपट सृष्टीत जाण्याचा निर्णय घेतला. दोन चित्रपटानंतर त्यांनी अनमोल, सहारा, अवसर, घमंड, निलमणी और कृष्ण सुदामा या चित्रपटातून कामे केली, पण यापैकी एकही चित्रपट यशस्वी होऊ शकला नाही.

महबूब खान यांच्या 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मदर इंडिया’ या चित्रपटात राजकुमार गावातील एका छोट्या शेतकऱ्याच्या भूमिकेत दिसले. या छोट्याशा भूमिकेतील दमदार अभिनयाने राजकुमार यांना केवळ हिंदी चित्रपट सृष्टीतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिनेता म्हणून ख्याती मिळवून दिली. यानंतर त्यांची यशस्वी कारकिर्द सुरू झाली.

बी. आर. फिल्म निर्मित व यश चोप्रा दिग्दर्शित ‘वक्त’ या मल्टिस्टार कास्ट चित्रपटातील त्यांनी रहेमान यांना उद्देशून केलेला संवाद त्या काळात प्रचंड गाजला व असे संवाद म्हणजेच आपली अभिनयशैली असे ते मानू लागले. तो संवाद होता, चिनॉय शेठ शिशे के घर में रहनेवाले लोग दुसरों के उपर पत्थर नही फेंका करते.. यह चाकू कोई बच्चे के खेलने की चीज नही, हाथ कट जाएगा तो खून निकल आयेगा.. या संवादाला रसिकांच्या प्रचंड टाळ्या पडल्या. या यशानंतर राजकुमार यांनी अभिनयापेक्षा संवादफेकीवर जरा जास्तच लक्ष केंद्रित केले. कधी ते प्रभावी देखील ठरले.

पाकिजामध्ये राजकुमार मीनाकुमारी यांना एकदा म्हणतात, यह पाँव जमीं पे मत रख देना, मैले हो जायेंगे.. पण एका विशिष्ट लयीतील संवाद अशी त्याची ओळख व ताकददेखील झाल्याने दिग्दर्शक त्यांना स्वातंत्र्य देत असत असे जाणवू लागले. आणि याच गुणावर फिदा असणारा असा त्यांचा स्वत:चा एक मोठा चाहता वर्गही निर्माण झाला. तो राजकुमारचे संवाद ऐकायला सिनेमाचे तिकीट काढू लागला. त्यांच्या संवादावर मनसोक्त टाळ्या मारू लागला. 

गिरगावातील इम्पिरियल या चित्रपटगृहाच्या भिंतीवर त्यांचे बुलंदीचे संवाद लिहिले होते, ते वाचून तिकीट काढणारे फिल्म दीवाने होते. हेदेखील यशच ! मेहबूब खान यांचा मदर इंडिया, श्रीधरचा दिल एक मंदिर, चेतन आनंदचा हीर रांझा या चित्रपटांत राजकुमार यांचा उत्तम अभिनय पाहायला मिळतो. दिल अपना और प्रीत परायी हा राजकुमार यांचा एक महत्त्वपूर्ण चित्रपट. एका डॉक्टरच्या भूमिकेत, नर्स असलेल्या मीनाकुमारी यांच्याबरोबर, त्यांची अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षक विसरू शकत नाहीत. जेमिनी पिक्चर्सच्या एस. एस. वासन दिग्दर्शित ‘पैगाम’ नंतर मुक्ता आर्ट्सच्या सुभाष घई दिग्दर्शित ‘सौदागर’ मध्ये ते तब्बल एकतीस वर्षांनी दिलीपकुमार समोर उभा ठाकले. कारकिर्दीच्या सुरुवातीला दिलीप -देव – राज या त्रिमूर्तीच्या वाटचालीतही या जानीने उभे राहण्यात यश मिळवले व नंतर मनोजकुमार सुनील दत्त – धर्मेद्र – जीतेंद्र – राजेश खन्ना यांच्यासमोरही ते वाटचाल करू शकले. अर्थात, त्यांचे वळण, त्यांचा रस्ता पूर्णपणे वेगळा होता. 

राजकुमार हे वेगळे रसायन होते हे त्यात त्यांनी सतत सिद्ध केले, अगदी त्यांच्या मृत्यूची बातमीदेखील त्यांच्या त्या वाटचालीला साजेशी ठरली. त्यांना कर्करोगाने ग्रासले असल्याची बराच काळ चर्चा असूनही त्या दरम्यान त्यांनी ‘सौदागर’ मधील भूमिका साकारली होती, पुढेही काही काळ वाटचाल केली. राजकुमार यांचे काही महत्त्वाचे व उल्लेखनीय चित्रपट – अर्धागिनी, नीलकमल, जिंदगी, हमराज, मेरे हुजूर. त्यांचे संवाद लोकप्रिय होण्यासोबत त्यांना ‘डॉयलॉग किंग’ ही पदवी प्रेक्षकांनी बहाल केली होती. राजकुमार यांचे 3 जुलै 1996 ला निधन झाले. राजकुमार यांना आदरांजली.

शब्दांकन : संजीव वेलणकर