मराठी चित्रपट सृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ रविंद्र महाजनी : तीन वर्ष मुंबईत चालवली टॅक्सी

टीम AM : मराठी सिनेसृष्टी गाजवणारे अभिनेते‌ रविंद्र महाजनी यांचा काल स्मृतिदिन होता. जाणून घेऊयात त्यांचा जीवनप्रवास. रविंद्र महाजनी यांचा जन्म. 7 ऑक्टोबर 1949 ला झाला. सत्तरच्या दशकात आपल्या प्रसन्न व्यक्तीमत्वामुळे रविंद्र महाजनी मराठी चित्रपट सृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखले जात असत. त्यांनी मराठी सोबतच काही हिंदी आणि गुजराती चित्रपटात पण अभिनय केला आहे.

मराठीमध्ये त्यांनी ‘जुलुम’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. ‘आराम हराम आहे’, ‘मरी हेल उतारो राज’, ‘दुनिया करी सलाम’, ‘तीन चेहरे’, ‘चोरावर मोर’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘लक्ष्मीचे पाऊले’, ‘बेआबरू’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘बढ़कर’, ‘गंगा किनारे’, ‘नैन मिले चैन कहाँ’, ‘कानून कानून है’, ‘वहम’ आणि ‘गूंज’ हे त्यांचे प्रमुख चित्रपट आहेत. 

रविंद्र महाजनींना तुम्हांला गश्मीरकडे पाहून आपल्या करिअरच्या सुरूवातीच्या दिवसांची आठवण येते का असं विचारले असता, रविंद्र महाजनी म्हणाले, ‘त्याची आणि माझी परिस्थिती यात जमीन – आस्मानाचा फरक आहे. मी त्याच्या वयाचा असताना टॅक्सी चालवत होतो. मी खालसा महाविद्यालयात होतो. तेव्हा रमेश तलवार, अवतार गिल, अमृत पटेल, रॉबीन भट हे सगळे माझे तेव्हांचे मित्र. आम्हा सर्वांना नाटकाची आवड. पण वडील स्वातंत्र्यसैनिक असल्याने पैसेही जेमतेमच गाठीशी होते. आणि नोकरी करणं गरजेचे होते. मग ॲक्टिंग करणं आणि पैसे कमावणे यातनं सुवर्णमध्य काढला आणि दिवसा निर्मात्यांना भेटता यावे, म्हणून रात्री टॅक्सी चालवायला लागलो.

रात्री पैसे कमवायचो आणि दिवसा ॲक्टिंगचे वेड जपण्याचा प्रयत्न केला. तीन वर्ष मुंबईत टॅक्सी चालवली. माझ्या नातेवाईकांनी टॅक्सी चालवतो, म्हणून माझ्याशी संबंध तोडले. पण मराठी चित्रपटांमध्ये यश मिळाले आणि सर्व नातेवाईक परत नीट बोलू लागले. त्यामुळे गश्मीरची आणि माझी परिस्थितीच विसंगत होती. तो लहान असताना सुध्दा गश्मीरने उद्या काही वेगळं करायचं म्हटलं तर चार पैसे आपल्या गाठीशी हवेत, या विचाराने मी ॲक्टिंग सोडली आणि कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय सुरू केला.

रविंद्र महाजनी यांचे वडिल ह. रा. महाजनी हे स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार होते. एका प्रतिथयश आणि लोकप्रिय वर्तमानपत्राचे ते संपादक होते. वडिलांची शिकवण रविंद्र महाजनी यांनी आयुष्यभर लक्षात ठेवली ते पूढे म्हणतात, ‘वडील मला म्हणायचे, तु कुठलंही काम कर. पण प्रामाणिकपणे कर. त्या कामाशी बेईमानी करू नकोस. बघ, यश तुझंच आहे. वडील संपादक होते, त्यामुळे बाळासाहेब देसाई ते यशवंतराव चव्हाण अनेक मोठ्या मंत्र्यांची घरी ये – जा असायची. पण कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता, त्यांनी आपल्या परखड आणि काटेखोर पत्रकारितेमुळे आणि मुल्यांमुळे पत्रकारितेत इतिहास घडवला. हे मला कधीच विसरता येणार नाही. आणि तिचं शिकवण आज मी माझ्या मुलाला देतो आहे. त्यांचे चिरंजीव गश्मीर महाजनी हे ही चित्रपट अभिनेते असून ते सुद्धा वडिलाच्या पाऊलवाटेवर यशस्वीपणे पुढे जात आहेत.  

रवीन्द्र महाजनी यांनी ‘काय राव तुम्ही’ या चित्रपटातून मराठी चित्रपटांमध्ये पुनरागमन केले. 14 जुलै 2023 रोजी पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे त्यांचे निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ग्लॅमरस जगात राहूनही नॉन – ग्लॅमरस आयुष्य जगणारे रविंद्र महाजनी यांना अभिवादन.

शब्दांकन : संजीव वेलणकर