टीम AM : हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता, निर्माता व पंजाबी – भारतीय राजकारणी विनोद खन्ना यांचा जन्मदिन. विनोद खन्ना यांचा जन्म. 6 ऑक्टोबर 1946 ला पाकिस्तानातील पेशावर येथे झाला. 1968 साली ‘मन का मीत’ या हिंदी चित्रपटातील खलनायकी भूमिकेद्वारे विनोद खन्ना यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले, मात्र यांच्या नायक किंवा सहनायक भूमिका लक्षवेधक ठरल्या. त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटांपैकी अचानक, परवरिश, अमर अकबर अँथोनी, मुकद्दर का सिकंदर, द बर्निंग ट्रेन हे चित्रपट विशेष गाजले.
1975 मध्ये विनोद यांनी जेव्हा सिनेमांमधून सन्यास घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. यानंतर विनोद अमेरिकेत निघून गेले आणि ओशोंसोबत पाच वर्षे राहिले. ओशोंच्या आश्रमात या सुपरस्टारने भांडी घासण्यापासून ते माळीपर्यंतची सगळी कामं केली. ओशोंची शिष्यवृत्ती स्वीकारल्यानंतर विनोद खन्ना यांनी त्यांचे अनेक महागडे कपडे, बूट आणि अन्य महागड्या गोष्टी दान केल्या.
विनोद खन्ना यांना नंतर वैवाहिक जीवनातही स्वारस्य वाटत नव्हते. त्यांच्या या निर्णयामुळे कौटुंबिक कलहात वाढ होत गेली. गीतांजली यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. गीतांजली आणि विनोद यांना अक्षय आणि राहूल ही दोन मुलं आहेत. काही वर्षांनंतर विनोद खन्ना यांनी ओशोंचे आश्रम सोडले आणि घरी परतले. विनोद खन्ना पंजाबातील गुरुदासपुर मतदारसंघातून बाराव्या, तेराव्या व चौदाव्या लोकसभेत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आले. 2002 मध्ये ते केंद्रीय मंत्रिमंडळात सांस्कृतिक व पर्यटन मंत्री म्हणून तर त्यानंतर काही महिन्यांनी परराष्ट्र खात्याचा राज्यमंत्री म्हणून नियुक्त होते. विनोद खन्ना यांचे निधन 27 एप्रिल 2017 रोजी झाले.
शब्दांकन : संजीव वेलणकर