दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ‘स्वाभिमानी’ करणार रास्ता रोको

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात सर्वत्र अपुऱ्या पावसामुळे दुष्काळ जन्य परिस्थिती उदभवली असून पिण्याच्या पाणी, जनावरांना चारा, पाणी, खरीप हंगामातील लागवड झालेल्या पिकांचे सरसकट नुकसानीचे महसूल प्रशासनाने पंचनामे करून एकरी सरसकट 1 लाख रुपये मदत अनुदान तात्काळ देण्यात यावे तसेच पूरग्रस्तांचे व दुष्काळ ग्रस्तांचे प्रश्न व्यवस्थित मार्गी लागेपर्यंत आगामी विधानसभा निवडणूका पुढे ढकलन्यात याव्यात. यासह आदी विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बीड – लातूर – अंबाजोगाई महामार्गावर लोखंडी सावरगाव येथे दि.5 सप्टेंबर,गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, प्रवक्ते प्रकाश बोरगावकर, केज विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष दत्ताभाऊ गंगणे,केजचे प्रमोद पांचाळ योगेश शेळके, महेश गंगणे, शहराध्यक्ष अभिजीत लोमटे,चंद्रकांत आंबाड यांनी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांना बुधवार,दि 28 रोजी देण्यात आले.

सदरील निवेदनात शेतकऱ्यांनी पुढीलप्रमाणे मागण्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत सरसकट कर्जमुक्त करावे,बीड जिल्ह्यात सर्व महसूल मंडळात सरसकट दुष्काळ जाहीर करून पिकांचे 100% नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत व एकरी 1 लक्ष रु मदत अनुदान वितरित करावे,बीड जिल्ह्यात अपुऱ्या पावसामुळे नैसर्गिक चारा व पाणी मुबलक उपलब्ध झाले नाही त्यामुळे जनावरांना व नागरिकांना जगवण्यासाठी विशेष दुष्काळ निवारण कृती आराखडा तयार करून ‘पायलट योजना’ राबवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.बेरोजगार युवकांचे अण्णासाहेब पाटिल आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत विनाविलंब पात्र कर्जाची प्रकरणे निकाली काढावीत.रोजगार हमी योजने अंतर्गत भूमिहीन शेतमजुरांना प्राधान्य देऊन रोजगार तात्काळ उपलब्ध करावा,शेतकऱ्यांचे वीजबिल सरसकट माफ करावे यासह विविध मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत.