स्वातंत्र्य सैनिक गृह निर्माण संस्थेत अतिक्रमणांचा विळखा : संचालक मंडळाचीही निवडणूक बेकायदेशीर ?, 1 जानेवारीपासून आमरण उपोषण…!

टीम AM : अंबाजोगाई शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चनई रोडवरील स्वातंत्र्य सैनिक गृहनिर्माण संस्था सध्या विविध मुद्यांनी गाजत आहे. संस्थेत असणाऱ्या प्लॉट्सवर झालेले अतिक्रमण असो की, संस्थेची झालेली बेकायदेशीर निवडणूक ? यामुळे संस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून याच्याच निषेधार्थ दिनांक 1 जानेवारी 2027 पासून अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिभा वामनराव ठाकूर (वय – 87) या आमरण उपोषणास बसणार आहेत. त्यामुळे संस्थेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

या संदर्भात अपर जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वातंत्र्य सैनिक गृहनिर्माण संस्था स्वातंत्र्य सैनिकांच्या मेहनतीने उभा राहिली आहे. आज त्यांचे पाल्य या ठिकाणी राहत आहेत. फार थोडी स्वातंत्र्य सैनिक जिवंत असतील. परंतू, ते खूप थकलेले आहेत. येथील गैरप्रकाराबाबत गेली वर्षभर अर्ज, विनंती करित आहे. परंतू, का कुणास ठाऊक येथील प्रशासन ठप्प आहे. काहीच कारवाई करत नाही. म्हणून शेवटचा अर्ज आपणांस करुन मी 1 जानेवारी 2027 पासून आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसण्याच्या मानसिकतेत आहे. येथे संस्थेची निवडणूक घेण्यात आली,  परंतू कुठल्याच सभासदाला मतदान करता आले नाही. येथे प्लॉट्स मोजण्यास इंजिनिअर नाही. काहींनी पाच फुट जागा जास्त घेऊन कंपाऊंड बांधले आहेत. काहींचे प्लॉट्स रिकामे आहेत. इथे फक्त स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांचे पाल्यचं घरे बांधून राहु शकतो. परंतू, इथे अतिक्रमण करुन लोक घरे बांधून राहत आहेत. संस्थेचे क्षेत्रफळ कमी होत आहे. स्वयंघोषित अध्यक्ष, सचिव, प्रशासन याकडे गांभीर्याने पहात नसेल तर आपल्या कार्यालयासमोर जीवनयात्रा संपविण्याशिवाय पर्याय नाही, असे निवेदनात म्हंटले आहे. दरम्यान, प्रशासनाने याकडे गांभीर्याने पहात कार्यवाही करावी, अशी मागणी प्रतिभा ठाकूर यांनी केली आहे.

प्रशासक नेमावा‌.‌..!

स्वातंत्र्य सैनिक गृहनिर्माण संस्थेतील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करित तेथील रहिवाशांनी गंभीर आरोप केले आहेत. यावेळी रविंद्र ठाकूर आणि परिसरातील काही महिला उपस्थित होत्या. त्यांनी संचालक मंडळाची घेतलेली निवडणूक बेकायदेशीर आहे, असे सांगितले. त्यासोबतच प्रशासनाने याची दखल घेत प्रशासक नेमावा, अशीही मागणी केली आहे. दरम्यान, अंबाजोगाई तालुका प्रशासन यावर कोणती कार्यवाही करते ? याकडे रहिवाशांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here