टीम AM : मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेते म्हणजे अजिंक्य देव. आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. मात्र, अभिनय क्षेत्रापलीकडे जाऊन त्यांनी आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी केलेलं कामही तितकंच कौतुकास्पद आहे. विशेषतः त्यांची मुलगी तनया हिच्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आणि उभारलेलं कार्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
अजिंक्य देव यांची लाडकी लेक तनया ही विशेष गरजा असलेली मुलगी आहे. मुलगी विशेष असल्याचं समजल्यानंतर अजिंक्य देव आणि त्यांच्या पत्नी आरती देव यांनी खचून न जाता तिच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू केले. तनयाला जपताना त्यांनी तिच्याकडूनच आयुष्याकडे पाहण्याची नवी प्रेरणा घेतली.
इतकंच नव्हे तर तनयासारख्या इतर विशेष मुलांनाही योग्य शिक्षण आणि विकासाच्या संधी मिळाव्यात, या उद्देशाने देव दाम्पत्याने एक महत्त्वाचं पाऊल उचललं. न्यू जर्सी येथील ‘ऑटिझम इन्स्टिट्यूट’ च्या सहकार्याने त्यांनी मुंबईत ‘अकॅडमी ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंट’ (ALD) ही विशेष मुलांसाठी शाळा सुरू केली.
या शाळेला आता 14 वर्षांहून अधिक काळ पूर्ण झाला आहे. या माध्यमातून अनेक विशेष मुलांना शिक्षण, मार्गदर्शन आणि स्वतःच्या क्षमता विकसित करण्यासाठी पोषक वातावरण मिळत आहे. अनेक मुलांसाठी ही शाळा केवळ शिक्षणाचं ठिकाण नसून हक्काचं घर बनली आहे.
अजिंक्य देव अनेकदा आपल्या मुलीबद्दल अभिमानाने बोलताना दिसतात. मुलगी ही आपल्यासाठी ओझं नसून प्रेरणा असल्याची त्यांची भावना अनेकांना भावते. एका वडिलांनी आपल्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून इतर अनेक मुलांसाठीही शिक्षणाची दारं खुली करण्याचं काम केलं आहे.
खरंच, बाप तो बाप असतो ! अजिंक्य देव आणि आरती देव यांनी आपल्या कृतीतून पालकत्वाचा एक सुंदर आदर्श समाजासमोर ठेवला आहे. त्यांच्या या कौतुकास्पद कार्याचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.



