टीम AM : मराठवाड्यात 10 महिन्यांच्या कालखंडात जवळपास 750 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. महाराष्ट्राचा जर विचार केला तर याच कालावधीत तब्बल 950 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. याला जबाबदार फडणवीस सरकारचं चुकीचं धोरण असून शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने पावलं उचलण्याची गरज आहे. अल्पभूधारक, कोरडवाहू शेतकरी आणि शेतमजूराला सरकारने मासिक सरसगट 5 हजार रुपायांची मदत केली पाहिजे, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अध्यक्ष ॲड. डॉ. सुरेश माने यांनी केली.
बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अध्यक्ष ॲड. डॉ. सुरेश माने अंबाजोगाईत आले असता त्यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेला ॲड. माणिक आदमाने, राहुल शिंदे यांच्यासह आदींची उपस्थिती होती
पत्रकारांशी संवाद साधताना अँड सुरेश माने म्हणाले की, मराठवाड्याचा तब्बल 60 हजार कोटींचा विकासाचा अनुशेष शिल्लक आहे. परंतू, मराठवाड्यातील लीडरशिप यावर बोलायला तयार नाही. प्रत्येक जण आपल्या मतदारसंघातील मतांचं बेरेजेचं राजकारण करण्यात गुंतलेला आहे, त्यामुळे विकासाच्या मुद्यांकडे दुर्लक्ष होत असून मराठवाड्याचं फार मोठं नुकसान होत आहे.
बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा 15 डिसेंबरला नागपुरात भव्य धडक मोर्चा
महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी व समविचारी संघटनांच्या वतीने 15 डिसेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता नागपूर येथे भव्य धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ॲड. डॉ. सुरेश माने यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या मोर्चातून राज्य व केंद्र सरकारच्या विविध धोरणांवर प्रश्न उपस्थित करून बहुजन समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारला जाब विचारण्यात येणार आहे.
अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण, ओबीसींची जातनिहाय जनगणना, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे आरक्षण, मुस्लिमांचे शैक्षणिक आरक्षण, गोवारी समाजाला स्वतंत्र आरक्षण, आदिवासींचे हक्क, वनहक्क कायदा तसेच एस.सी., एस.टी. बजेट कायदा आदी महत्त्वाच्या विषयांवर या मोर्चात आवाज उठविण्यात येणार आहे. याशिवाय स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी आणि विदर्भ, मराठवाडा व कोकण विभागाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्याची मागणीही करण्यात येणार आहे. या मोर्चात महाराष्ट्रातून जवळपास 50 हजार नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती ॲड. डॉ. सुरेश माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.



