अंबाजोगाई ग्रामीण रुग्णालयात गैरहजेरीचा दणका : दोन वैद्यकीय अधिकारी निलंबित…!

टीम AM : रुग्ण उपचारासाठी ताटकळत असताना वैद्यकीय अधिकारीच गैरहजर राहत असल्याचा प्रकार अंबाजोगाईच्या ग्रामीण रुग्णालयात समोर आला आहे. सतत गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवत दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

अंबाजोगाई शहरातील मंडीबाजार परिसरात सार्वजनिक आरोग्य विभागाचे ग्रामीण रुग्णालय आहे. हे रुग्णालय सध्या विविध मुद्यांनी गाजत आहे. या रुग्णालयात ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, अपुऱ्या सुविधा आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सतत गैरहजेरीमुळे सर्वसामान्य रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच्या तक्रारी सातत्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक करीत होते. 

या तक्रारींची दखल घेत बीड येथील वैद्यकीय अधिकारी शेख रौफ यांनी रुग्णालयाला भेट देऊन रुग्णालयाचा चांगलाच पंचनामा केला. यावेळी काही वैद्यकीय अधिकारी नियमित गैरहजर राहत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सतत गैरहजर राहणाऱ्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

रुग्णालयात डॉक्टरांची गैरहजेरी, सुविधांचा अभाव आणि रुग्णांची होणारी गैरसोय यावर आता तरी ठोस उपाययोजना होणार का‌ ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. निलंबनाच्या कारवाईपुरतीच प्रशासनाची भूमिका मर्यादित न राहता रुग्णालयातील आरोग्य सेवा सुधाराव्यात आणि रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत, अशी अपेक्षा अंबाजोगाईकरांकडून  व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here