टीम AM : दलित पँथर आणि विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘ढसाळ’ या बहुप्रतीक्षित चरित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर या प्रतिक्षेला पूर्णविराम मिळाला असून, येत्या 1 ऑक्टोबर 2026 मध्ये हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. ‘ढसाळ’ मध्ये ललित प्रभाकर नामदेव ढसाळ यांच्या भूमिकेत झळकणार असून, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमधून त्यांच्या लूकची प्रभावी झलकही समोर आली आहे. ललित प्रभाकरच्या या भूमिकेकडे सर्वांचे विशेष लक्ष लागले असून, त्याने साकारलेला ढसाळांचा बंडखोर आणि तडफदार आविष्कार प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
संजय पांडेय आणि दि बायोस्कोप फिल्म्स प्रस्तुत वरुणा मदनलाल राणा निर्मित या चित्रपटात दलित पँथर चळवळीचे प्रणेते, विद्रोही कवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या संघर्षमय आणि ज्वलंत जीवनप्रवासाचे वास्तववादी चित्रण पाहायला मिळणार आहे. वरुणा राणा लिखित व दिग्दर्शित आणि प्रताप गंगावणे यांच्या प्रभावी संवादांनी सजलेल्या या चित्रपटातून अन्याय आणि शोषणाविरुद्ध नामदेव ढसाळ यांनी उभारलेला लढा, त्यांच्या लेखणीतून पेटलेली क्रांती आणि समाजमनाला हादरवून टाकणारे विचार यांचा ठसा उमटणार आहे. या चित्रपटाला देशातील दिग्गज दाक्षिणात्य संगीतकार इलैयाराजा यांचे संगीत लाभले आहे. हिंदी सिनेसृष्टितील प्रसिद्ध गीतकार इर्शाद कामील, तसेच मराठीतील गुरु ठाकूर यांनी या चित्रपटाची गाणी लिहिलेली आहेत. या चित्रपटात ललित प्रभाकरचे नामदेव ढसाळाच्या रूपात रूपांतर प्रख्यात रंगभूषाकार श्रीकांत देसाई यांनी केले आहे.



