पावसाने दिला दगा : अंबाजोगाईत खरीप पिके संकटात..!

अंबाजोगाई तालुकास्तरीय समितीकडून विविध गावांतील पिकांची प्रत्यक्ष पाहणी

टीम AM : जून महिन्यापासून पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने आणि वारंवार पावसाचा खंड पडल्यामुळे अंबाजोगाई तालुक्यातील खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. तालुक्यातील अनेक भागांत 60 ते 70 टक्के पीक नुकसान झाल्याचे तालुकास्तरीय समितीच्या प्रत्यक्ष पाहणीत निदर्शनास आले.

रविवार, दि. 13 सप्टेंबर रोजी उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समितीने विविध गावांतील शेतांवर जाऊन पीक परिस्थितीची पाहणी केली. अंबाजोगाई, लोखंडी सावरगाव, पाटोदा, राडी, बर्दापूर, घाटनांदूर आणि उजणी या सात महसूल मंडळांतील विविध गावांमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात सॅम्पल प्लॉटची पाहणी करण्यात आली. यामध्ये साकूड, काळवटी, येल्डा, चिंचखंडी, राक्षसवाडी, बर्दापूर, अंबलटेक, तेलघणा, मुरकुटवाडी, दरडवाडी, वाघाळा, कुंबेफळ, नांदडी आणि कोळकानडी आदी गावांचा समावेश होता. पावसाच्या दीर्घ खंडामुळे सोयाबीन, तूर, कापूस यासह अन्य खरीप पिकांच्या वाढीवर गंभीर परिणाम झाला असून अनेक शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

पाहणीदरम्यान प्रशासनाच्या पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तालुक्यातील पीक परिस्थिती गंभीर असल्याचे या पाहणीत स्पष्ट झाले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी यापूर्वी तातडीची बैठक घेऊन संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाकडून प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचा आढावा घेण्यात आला आहे. पाहणीच्या आधारे शासनाकडे सविस्तर अहवाल पाठविण्याची प्रक्रिया सुरू असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याबाबत आता शासनाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

या पाहणीस उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे, तहसीलदार विलास तरंगे, गटविकास अधिकारी कैलास बळवंत, तालुका कृषी अधिकारी विजयकुमार पवार यांच्यासह मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच आणि शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here