मुंबई – पुणे बुलेट ट्रेनला गती : घाटनांदूर – श्रीगोंदा रेल्वेमार्ग अजूनही कागदावरच…!

टीम AM : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई – पुणे दरम्यान हायस्पीड अर्थात ‘बुलेट ट्रेन कॉरिडॉर’ विकसित करण्याची घोषणा केली आहे. या मार्गाचे काम 2027 मध्ये सुरू करण्याचे संकेत देण्यात आले असून मुंबई – पुणे हा सुमारे 170 किलोमीटरचा प्रवास अवघ्या 48 मिनिटांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. एकीकडे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांना केंद्राकडून गती मिळत असताना दुसरीकडे घाटनांदूर – अंबाजोगाई – केज – जामखेड – श्रीगोंदा या प्रस्तावित रेल्वे मार्गाकडे मात्र अद्याप अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याची भावना या भागातील जनतेमध्ये निर्माण झाली आहे. या मार्गाच्या सर्वेक्षणाची चर्चा यापूर्वीही झाली आहे. मात्र, प्रत्यक्ष रेल्वे मार्गाच्या दिशेने ठोस पावले पडलेली दिसत नसल्याने जनतेमध्ये नाराजी आहे.

बीड जिल्ह्याला रेल्वेच्या माध्यमातून पुणे शहराशी जोडणारी सेवा 17 सप्टेंबरपासून सुरू होत असल्याने जिल्ह्याच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीला नवी दिशा मिळणार आहे. परंतू, घाटनांदूर – श्रीगोंदा रेल्वे मार्गाचा प्रश्न अजूनही दुर्लक्षित राहिला आहे. केवळ निवेदनं देणं, पत्रव्यवहार करणं एवढ्यावरच हा प्रश्न सुटणार आहे का ? ‘निवेदन दिले की रेल्वे येईल’ असा गूढ गैरसमज या भागातील लोकप्रतिनिधींना झाला आहे का ? असा सवाल आता जनतेतून उपस्थित केला जात आहे.

मुंबई – पुणे यांसारख्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पांच्या घोषणा आणि नियोजनाला वेग मिळत असताना मराठवाड्यातील या महत्त्वाच्या रेल्वे मार्गासाठी ठोस पाठपुरावा, निधीची तरतूद, व्यवहार्यता आणि प्रशासकीय पातळीवरील निर्णय यासाठी लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेण्याची गरज आहे.

घाटनांदूर – अंबाजोगाई – केज – जामखेड – श्रीगोंदा रेल्वे मार्गामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दळणवळणाला मोठी चालना मिळू शकते. त्यामुळे आमदार आणि खासदारांनी आता केवळ निवेदनांपुरता पाठपुरावा न करता केंद्र सरकारकडे सातत्याने दबाव निर्माण करून या मार्गाला प्रत्यक्ष गती मिळवून द्यावी, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

मुंबई – पुणे बुलेट ट्रेन धावण्याच्या दिशेने पावलं पडत असताना, घाटनांदूर – श्रीगोंदा रेल्वेचे स्वप्न मात्र अजून किती वर्षे कागदावरच राहणार ? हा प्रश्न आता या भागातील जनतेला पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here