टीम AM : कल्याण – लातूर ‘जनकल्याण’ एक्सप्रेसवेला राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या प्रकल्पावर काम करणार आहे. हा महामार्ग तब्बल 442 किलोमीटर लांबीचा असेल.
कल्याणवरुन लातूरला जायला सध्या 10 – 11 तास लागतात. ‘जनकल्याण’ एक्सप्रेसवेमुळे 4 – 5 तासांमध्ये कल्याणवरुन लातूर गाठता येईल.
कल्याणपासून सुरु होणारा हा महामार्ग मुरबाड, माळशेज घाट, ओतूर – आळेफाटा, अहिल्यानगर, पाथर्डी, बीड, मांजरसुंभा आणि अंबाजोगाई मार्गे लातूरपर्यंत जाणार आहे. या मार्गावर 17 इंटरचेज असतील. राज्यातले इतर महामार्ग आणि कॉरिडोरलाही हा महामार्ग जोडला जाणार आहे. या प्रकल्पासाठी 35 हजार कोटींचा खर्च येऊ शकतो.



