केजला 2 कोटी : अंबाजोगाईकरांसाठी लाजीरवाणी बाब‌ ; महापुरुषांचे चौक आजही सुशोभीकरणाच्या प्रतीक्षेत…!

टीम AM : केज येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराच्या विकासासाठी केज नगरपंचायतीला वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याबाबतचा शासन निर्णय 4 सप्टेंबर 2026 रोजी नगरविकास विभागाने जारी केला. केज मतदारसंघाच्या माजी आमदार व शिवसेना उपनेत्या प्रा. संगीता विजयप्रकाश ठोंबरे यांनी या निधीसाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने शिवप्रेमी आणि नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

दरम्यान, केजच्या चौकांचे सुशोभीकरण होत असले तरी अंबाजोगाई येथील महापुरुषांच्या चौकांची दयनीय अवस्था आहे. अंबाजोगाईकरांसाठी निश्चितचं लाजीरवाणी बाब आहे. सध्या केज मतदारसंघाच्या विद्यमान आमदार नमिता मुंदडा आहेत. त्यांचेच सासरे नंदकिशोर मुंदडा नगराध्यक्ष आहेत. अंबाजोगाई शहरातील चौकांचे सुशोभीकरण करुन महापुरुषांचे पुतळे कधी बसविणार ? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

महापुरुषांची पुतळे प्रेरणादायी असतात. त्यामुळेच प्रत्येक देशात त्यांनी केलेल्या ऐतिहासिक कार्याचे स्मरण व्हावे, यासाठी स्मारक, पुतळे उभारले जातात. भारतात आणि राज्यातील प्रत्येक शहरात महापुरुषांची पुतळे चौकाचौकात ऐटीत उभारलेले दिसतात. या शहरातील पुतळ्यांकडे पाहिल्यानंतर निश्चितच प्रत्येकाच्या मनात इतिहासाची पाने उलगडली जातात. त्यासाठी प्रत्येक शहरातील महानगरपालिका, नगरपरिषद आणि महापुरुषांचे अनुयायी पुतळे उभारण्यासाठी आग्रही असतात. परंतू, अंबाजोगाई शहर याला अपवाद आहे. 

अंबाजोगाई शहरात गेल्या कित्येक ‌‌‌वर्षांपासून एकही महापुरुषांचा पुतळा उभारला गेला नाही. दुसरीकडे महापुरुषांच्या बहुतांश चौकांचे सुशोभीकरण हे ‌व्यक्तीगत पुढाकारातून आणि लोकसहभागातून करण्यात आले आहे. निश्चितच लोकप्रतिनिधींसाठी ही लाजीरवाणी बाब आहे. 

चौकांची उभारणी लोकसहभागातून…!

अंबाजोगाई शहरात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांसह अन्य ‌‌‌महापुरुषांच्या नावाने मध्यवर्ती ठिकाणी चौक आहेत. या चौकांची केवळ जयंतीदिनीच देखभाल होते. यातील बऱ्याच चौकांची उभारणी लोकसहभागातून करण्यात आली असल्याने निधीअभावी चौकांचा शुशोभिकरणाचा आराखडा साजेसा झाला नाही. त्यामुळे या चौकांची पुनर्बांधणी करुन त्या ठिकाणी महापुरुषांची पुतळे उभारण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. चौकांचे सुशोभीकरण आणि महापुरुषांची पुतळे उभारली गेल्यास निश्चितच शहराच्या वैभवात भर पडेल, अशी भावना महापुरुषांचे अनुयायी व्यक्त करित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here