टीम AM : तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची मन सुन्न करणारी घटना घडली. कौटुंबिक वादातून 18 वर्षीय कुणाल हा आत्महत्या करण्याच्या उद्देशाने डोंगरावर गेला होता. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचा तोल जाऊन दोघेही दरीत कोसळले. डोळ्यांसमोर पती आणि मुलाचा मृत्यू झाल्याचे पाहून धक्का बसलेल्या आईनेही त्याच कड्यावरून उडी घेतल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे.
कुणाल जवळपास तीन तास डोंगराच्या कड्यावर उभा होता. त्याचे आई – वडील तसेच ग्रामस्थ त्याची समजूत काढत होते. ग्रामस्थांनी त्याला जगण्याचे आवाहन केले, तर तिसगावच्या सरपंचांनी त्याला आयफोन देण्याचीही ऑफर दिली. मात्र, कुणालने ‘आता काहीच सोल्यूशन नाही,’ असे म्हणत टोकाचे पाऊल उचलले.
कुणालने कड्यावरून स्वतःला खाली झोकून दिल्यानंतर त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वडीलही खाली पडले. त्यानंतर पती आणि मुलाचा मृत्यू पाहून आईनेही उडी घेतल्याची माहिती आहे. या घटनेत तिघांचाही मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, कौटुंबिक वादाचे नेमके कारण काय होते, याचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.



