दहा वर्षांपासून रखडलेला घाटनांदूर – श्रीगोंदा रेल्वे प्रकल्प मार्गी लावा : खासदार सोनवणेंचे रेल्वे प्रशासनाला साकडे

टीम AM : घाटनांदूर – अंबाजोगाई – केज – नेकनूर – मांजरसुभा – पाटोदा – जामखेड – श्रीगोंदा या नवीन रेल्वे मार्गाला तातडीने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून काम सुरू करावे, अशी मागणी बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग मनोहर सोनवणे यांनी दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय कुमार श्रीवास्तव यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात खासदार सोनवणे यांनी दिनांक 2 मे 2026 रोजी पत्र पाठविले आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा रेल्वे मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, या प्रकल्पाचे प्राथमिक सर्वेक्षण 2016 मध्ये पूर्ण झाले आहे. मात्र, विविध तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे गेल्या जवळपास दहा वर्षांपासून प्रकल्प रखडल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

हा रेल्वे मार्ग अस्तित्वात आल्यास बीड जिल्ह्यातील रेल्वेपासून वंचित तालुके थेट रेल्वे नेटवर्कशी जोडले जातील. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रादरम्यानचा प्रवास सुलभ होण्यासोबतच शेतकऱ्यांना कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठी मोठी सुविधा मिळणार आहे. तसेच अंबाजोगाईतील शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्राला, औद्योगिक विकासाला, रोजगारनिर्मितीला आणि पर्यटनाला यामुळे चालना मिळेल, असे खासदार सोनवणे यांनी स्पष्ट केले.

या प्रकल्पासाठी आर्थिक वर्ष 2026 – 27 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, अंतिम स्थान सर्वेक्षण तसेच भूसंपादन प्रक्रिया तातडीने सुरू करावी आणि प्रकल्पाला प्राधान्य देऊन युद्धपातळीवर काम सुरू करावे, अशा चार प्रमुख मागण्या खासदार सोनवणे यांनी केल्या आहेत.

घाटनांदूरपासून अंबाजोगाई, केज, नेकनूर, मांजरसुभा, पाटोदा, जामखेडमार्गे श्रीगोंदा जोडणारा हा रेल्वे मार्ग बीड जिल्ह्यासह संपूर्ण परिसराच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना देणारा ठरेल. त्यामुळे या जनहिताच्या प्रकल्पाबाबत रेल्वे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा खासदार सोनवणे यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here