खळबळजनक : बीडमध्ये 45 लाखांची लाच, सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यावर ‘एसीबी’ ची कारवाई

टीम AM : सामाजिक वनीकरण विभागातील एका अधिकाऱ्याला तब्बल 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने शुक्रवारी (दि. 31) सायंकाळी रंगेहात पकडले. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.

श्रीनिवास लखमवाड असे सामाजिक वनीकरण विभागातील लाचखोर अधिकार्‍याचे नाव आहे. लखमवाड याने सन 2025 – 26 मधील वृक्षलागवडीची बिले मंजूर करून देण्यासाठी, कर्मचार्‍यांचे थकीत वेतन अदा करण्यासाठी तसेच निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी 45 लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती. तक्रारदाराने 29 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर ‘एसीबी’ कडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ‘एसीबी’ च्या पथकाने शुक्रवारी दुपारी सापळा रचला. यावेळी श्रीनिवास लखमवाड याला 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. यामध्ये पाच लाख रुपये खर्‍या नोटा व बाकी मनोरंजन (खोट्या नोटा) बँक मधील नोटा स्वीकारताना ‘एसीबी’ ने रंगेहात पकडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान ही कारवाई छत्रपती संभाजीनगर येथील ‘एसीबी’ च्या टिमने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here