परिवहन आयुक्तांनी सादर केला होता प्रस्ताव : बांधकामाचा मार्ग मोकळा
टीम AM : अंबाजोगाई येथील उप – प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दुसऱ्या टप्प्यातील इमारत बांधकामासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी 14 कोटी 99 लाख 75 हजार 406 रुपये इतक्या निधीस प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली असून, संबंधित शासन निर्णय 17 एप्रिल 2026 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
परिवहन आयुक्तांनी फेब्रुवारी 2026 मध्ये सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने आता प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. बीड जिल्ह्यातील वाहनधारकांची वाढती संख्या आणि वाढलेले प्रशासकीय कामकाज लक्षात घेता, सुसज्ज आणि आधुनिक इमारतीची गरज अधोरेखित होत होती.
शासनाने निधी मंजूर करताना काही महत्त्वाच्या अटीही घातल्या आहेत. त्यानुसार, बांधकाम सुरू करण्यापूर्वी वास्तुविशारदांकडून सविस्तर नकाशा मंजूर करून घेणे आवश्यक आहे. तसेच पर्यावरण विभागाच्या 2014 च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. नियोजित जागा विभागाच्या ताब्यात असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.
या प्रकल्पामुळे अंबाजोगाई ‘आरटीओ’ कार्यालयांतर्गत येणाऱ्या तालुक्यातील नागरिकांना एकाच छताखाली अधिक चांगल्या व आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. सुमारे 15 कोटी रुपयांच्या या निधीतून कार्यालयाचा विस्तार होऊन प्रशासनातील कार्यक्षमता, पारदर्शकता आणि सेवांचा वेग वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



