टीम AM : अंबाजोगाई शहरात प्रामाणिकपणाचे दर्शन घडवणारी घटना समोर आली असून, क्रांतीनगर येथील गॅरेज चालक खलील रफिक शेख यांनी एका महिलेची हरवलेली पर्स प्रामाणिकपणे पोलिसांकडे जमा करून कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
दिनांक 17 फेब्रुवारी रोजी दुपारी चनई परिसरात खलील शेख यांना 80 हजार रुपये रोख, सोन्याचे दागिने आणि मोबाईल असलेली पर्स आढळून आली. ही पर्स डोंगर पिंपळा येथील राधा पवार या महिला आपल्या मुलांना लघुशंकेसाठी थांबल्या असताना विसरून गेल्या होत्या.
पर्स सापडल्यानंतर खलील शेख यांनी कोणतीही लालूच न ठेवता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधत पर्स अंबाजोगाई पोलीस ठाण्यात जमा केली. पोलिसांनी पर्सच्या मालकिणीची खातरजमा करून सर्व रोकड व मौल्यवान ऐवज राधा पवार यांच्याकडे सुरक्षितपणे परत केला.
या प्रामाणिक कृतीबद्दल अंबाजोगाई पोलिसांनी खलील शेख यांचा विशेष सत्कार केला असून त्यांच्या या आदर्श वागणुकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



