टीम AM : प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक न घेतल्याचा आरोप करत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या वक्तव्याविरोधात महाराष्ट्रभर निषेधाच्या प्रतिक्रिया उमटत असून, त्याचे पडसाद अंबाजोगाई शहरातही उमटले.
येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंबेडकरी अनुयायी व सामाजिक कार्यकर्ते एकत्र जमले. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्या फोटोला जोडे मारून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार असून, प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या दिवशी त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करणे हे संविधानाचा आणि देशाच्या लोकशाही मूल्यांचा अपमान असल्याचे आंदोलकांनी यावेळी सांगितले.

आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मंत्री महाजन यांनी जाहीर माफी मागावी, तसेच भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये, अशी मागणी केली. यावेळी आंदोलकांनी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
या आंदोलनात कॉम्रेड बब्रुवान पोटभरे, ‘भीमशक्ती’ चे भीमराव सरवदे, रिपाईचे महेंद्र निकाळजे, लोकजनशक्ती पार्टीचे राजेश वाहुळे, वंचित बहुजन आघाडीचे शैलेश कांबळे, गोविंद मस्के, नितीन सरवदे, रमीज सर, धिमंत राष्ट्रपाल, अक्षय भुंबे, जीवन गायकवाड, विनोद शिंदे, सुनिल जगताप, विशाल पोटभरे, हमीद चौधरी, मनोज इंगळे, अशोक पालखे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



