नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
टीम AM : अंबाजोगाई नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या जोरात सुरू असून संपूर्ण अंबाजोगाई तालुका प्रशासन या प्रक्रियेसाठी युद्धपातळीवर तयारी करत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नगरपरिषद परिसराला चारही बाजूंनी बंदिस्त करण्यात आले असून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुख्य प्रवेशद्वारासह परिसरात सर्वत्र बॅरिकेड्स उभारल्याने एरवी दिसणारी गर्दी पूर्णपणे ओसरली असून परिसरात शुकशुकाट जाणवत आहे.
अंबाजोगाई नगरपरिषदेची निवडणूक घोषित झाल्यापासूनच अंबाजोगाई तालुका प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. निवडणूक कामांच्या ताणामुळे कर्मचाऱ्यांना रविवारी असणारी नियमित सुट्टी देखील मिळू शकली नाही. निवडणूक आयुक्तांनी उद्या रविवारी देखील अर्ज दाखल करण्यासाठी वेळ दिल्याने उद्या आणि सोमवारी अर्थात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे, तहसीलदार विलास तरंगे आणि मुख्याधिकारी प्रियांका टोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागातील अधिकारी – कर्मचारी तयारीत गुंतले आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
नगरपरिषद निवडणुकीसाठी कालपासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली असून आजही काही नेत्यांनी अर्ज दाखल केले. यात प्रामुख्याने ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, रिपब्लिकन पार्टी (खरात गट) तर्फे मुन्वर कुरेशी, तर शिवसेना (शिंदे गट) कडून गजानन मुडेगावकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला. दरम्यान, उद्या आणि परवा मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल होतील, अशी माहिती राजकीय पक्षांच्या सूत्रांनी आमच्या प्रतिनिधींना दिली आहे.



