अंबाजोगाईत थंडीचा गारठा ‌वाढला तर नगरपरिषदेची निवडणूक तापली : प्रशासनाची जय्यत ‌तयारी, अखेर आज उमेदवारी अर्ज दाखल, वाचा…!

टीम AM : अंबाजोगाई शहरात जशी जशी थंडी वाढू लागली आहे तशी तशी नगरपरिषदेची निवडणूक तापत आहे. दररोज फोडाफोडीच्या राजकारणाच्या नवीन घडामोडी अंबाजोगाईकरांना पहावयास मिळत आहेत. अगदी सकाळी मोदींच्या गटात तर दुपारी मुंदडांच्या गटात उमेदवार हेलकावे देत आहेत. त्यामुळे अंबाजोगाई नगरपरिषदेच्या निवडणूकीचा ‘सस्पेन्स’ शेवटपर्यंत कायम राहणार आहे, असं‌ आजच्या घडीला तर चित्र निर्माण झाले आहे. दुसरीकडे गेल्या चार दिवसापासून नगरपरिषदेच्या निवडणूकीची जय्यत तयारी करुन बसलेल्या प्रशासनाला ‌कुठल्याही प्रभागात उमेदवार सापडत नव्हता. अखेर आज‌ काही राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल ‌करण्यात आले आहेत, त्यामुळे खऱ्या अर्थाने ‌नगरपरिषदेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे, असेच‌ं‌ अंबाजोगाईतील जनतेला वाटत आहे.

नगरपरिषद निवडणूकीसाठी जय्यत तयारी

अंबाजोगाई तालुका प्रशासनाने नगरपरिषद निवडणूकीसाठी जय्यत तयारी केली असून नगरपरिषदेच्या परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. चारही बाजूने नगरपरिषद परिसर पुर्णपणे बंदिस्त केला ‌असून मुख्य प्रवेशद्वारावरही आजपासून बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे, तहसीलदार विलास तरंगे, मुख्याधिकारी प्रियंका टोंगे आणि अंबाजोगाई तालुका प्रशासनाचे विविध विभागातील कर्मचारी ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे नगरपरिषद परिसरात ऐरवी दिसणारी गर्दी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन ‌यांनी घेतला आढावा

अंबाजोगाई नगरपरिषदेच्या ‌निवडणूकीची पाहणी आणि तयारीचा आढावा घेण्यासाठी बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी नगरपरिषदेच्या ‌परिसराला भेट दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केलेल्या ‌तयारीबद्दल जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी समाधान व्यक्त केले आणि अंबाजोगाई तालुका प्रशासनाला काही महत्वपूर्ण सूचनाही केल्याची माहिती ‌मिळाली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक ‌: उमेदवारांची तारांबळ

अंबाजोगाई ‌नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून ‌आता काही मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. दुसरीकडे संभाव्य उमेदवार कागदपत्रांची ‌ जुळवाजुळव करण्यात व्यस्त असून ‌एकएक कागदाची जुळवाजुळव करताना त्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. त्यामुळे सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नगरपरिषद ‌परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होणार, हे मात्र निश्चित आहे.