टीम AM : अंबाजोगाई नगरपरिषदेच्या निवडणूकीचे वातावरण दिवसेंदिवस तापत चालले असून दररोज नवीन घडामोडी शहरात पहावयास मिळत आहेत. नगरपरिषदेच्या निवडणूकीत भाजपाचे नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर अंबाजोगाईत मुंदडा विरुद्ध मोदी अशी ‘हायहोल्टेज’ लढत होणार असं जवळपास निश्चित झालं आहे. दुसरीकडे मुंदडांना शह देण्यासाठी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनीही जोरदार तयारी सुरु केली असून कालचं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाल्याची खात्रीलायक माहिती समोर आली. त्यामुळे मुंदडानीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असली तरी त्यांनाही निवडणूक सोपी नाही, अशी चर्चा शहरात पहावयास मिळत आहे.
अंबाजोगाई नगरपरिषदेवर गेल्या दोन दशकांपासून राजकिशोर मोदी यांची निर्विवाद सत्ता आहे. पण यंदाच्या विधानसभा निवडणूकीत माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्यासाठी मोठी यंत्रणा उभी करुन भाजपाच्या मुंदडा गटाला तगडी फाईट दिली होती. त्यामुळे केज मतदार संघात कोट्यावधी रुपयांच्या विकासकामांची आकडे घोषीत करुनही अगदी काटावर नमिता मुंदडांंचा विजय झाला. ही सल मुंदडा गटाच्या जिव्हारी लागली आणि आता कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव स्वतः नंदकिशोर मुंदडा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदींना टक्कर देण्यासाठी नगरपरिषदेच्या निवडणूकीत उतरले आहेत. त्यामुळे मोदी – मुंदडा गटातचं थेट लढत होणार, असं स्पष्ट चित्र अंबाजोगाईत पहावयास मिळत आहे.
कार्यकर्त्यांच्या फोडाफोडी जोरात
नगरपरिषद निवडणूक घोषित झाल्यापासून मोदी – मुंदडा गटाचे कार्यकर्ते सक्रिय झाले असून नगरपरिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी कंबर कसून काम करीत आहेत. त्यातचं दररोज कार्यकर्ते या गटातून ‘त्या’ गटात प्रवेश करीत आहेत. त्यामुळे अंबाजोगाईत फोडाफोडीच्या राजकारणाचा उत आला आहे. अजूनही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पाच दिवसांचा कालावधी राहिला आहे. त्यामुळे निश्चितच अजूनही हे फोडाफोडीचे राजकारण अंबाजोगाईकरांना पहावयास मिळणार आहे. दुसरीकडे केवळ निवडणूकीसाठी ‘या’ गटातून ‘त्या’ गटात गेलेल्या कार्यकर्त्यांना जनता कितपत स्वीकारेल, हे काळ आणि वेळेच ठरवेल.
मुंदडांची विधानसभा सोडून पहिलीच निवडणूक
केज विधानसभा मतदारसंघात दिर्घ काळापासून मुंदडा कुटुंबाचे वर्चस्व आहे. काही अपवाद वगळता त्यांनीच मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. परंतू, विधानसभा निवडणूकीशिवाय त्यांनी इतर कोणत्याच निवडणूकीत प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही. या अगोदरही त्यांना त्यांच्या समर्थकांनी बऱ्याचदा विनवणी केली. परंतू, त्यांनी याला स्पष्ट नकार दिला. विधानसभा निवडणूक हीच आपलं अंतिम ध्येय असल्याचं त्यांनी सांगितले. परंतू, यंदाच्या नगरपरिषदेच्या निवडणूकीत कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी भूमिका बदलून प्रत्यक्ष निवडणूकीत सहभाग घेतला असून निवडणूक प्रतिष्ठेची करत जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यामुळे मुंदडांचा प्रत्यक्ष निवडणूकीतील सहभाग त्यांना फायद्याचा ठरतो की तोट्याचा ? हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.
मोदी – मुंदडा आघाडी करुनच लढणार ?
अंबाजोगाई नगरपरिषदेच्या निवडणूकीत जातीचे आणि राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी मोदी आणि मुंदडा गट आघाडी करुनच लढणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. काही प्रादेशिक पक्षांना, संघटनांना सोबत घेण्यासाठी राजकीय पक्षांच्या चिन्हांची अडचण होत असल्याने आघाडीच्या माध्यमातूनचं दोन्ही नेते निवडणूकीला सामोरे जातील, अशी दाट शक्यता दिसून येत आहे. त्या दृष्टीने त्यांनी तयारीही सुरु केली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
नगरपरिषदेच्या काही प्रभागात ‘या’ पक्षांचीही जोरदार तयारी
अंबाजोगाई नगरपरिषदेच्या निवडणूकीत बड्या राजकीय पक्षांसोबत कॉंग्रेस, वंचित बहुजन आघाडी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, शिवसेना, बहुजन विकास मोर्चा, ‘एमआयएम’, समाजवादी पार्टी यांच्यासह अनेक राजकीय पक्षांनी, संघटनांनी काही प्रभागात जोरदार तयारी सुरु केली असून निश्चितचं हे राजकीय पक्ष महत्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे प्रस्थापित पक्षांची डोकेदुखी वाढणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या पक्षांनी वार्डात बांधणी केली असल्याने काही प्रभागातील मतदारांचा कौल निर्णायक ठरणार आहे.



