लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची बातमी : ‘ई – केवायसी’ साठी…! वाचा…

टीम AM : राज्यातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ नियमित मिळावा आणि योजनेत पारदर्शकता यावी, यासाठी राज्य सरकारने ई – केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. या प्रक्रियेची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर असून फक्त 8 दिवस उरले आहेत. वेळेत ई-केवायसी न केल्यास 1500 रुपयांचा मासिक सन्मान निधी मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

राज्य महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, ई-केवायसीची सुविधा 18 सप्टेंबरपासून दोन महिन्यांच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आली असून, अनेक लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. ज्यांनी अजून ई – केवायसी केलेली नाही त्यांनी तात्काळ प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अशी करा ‘ई – केवायसी

लाडकी बहीण योजनेसाठी ई – केवायसीसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc उपलब्ध आहे. या वेबसाइटवर लॉगिन केल्यानंतर लाभार्थी महिलेला आपला पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक देऊन ओटीपी टाकावा लागतो. प्रक्रिया केवळ एका मिनिटात पूर्ण करता येते.

मात्र, काही महिलांना वेबसाइटवर ‘एरर’ दिसत असल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. विशेषतः विधवा महिलांना ‘केवायसी’ करताना समस्या भेडसावत आहे. शासनाने याबाबत स्वतंत्र तांत्रिक उपाय करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.