टीम AM : टायगर ग्रुपचे प्रमुख कोंडीराम पवार यांनी स्वा. रा.ती. रुग्णालयातील ‘सिटी स्कॅन’ मशीन तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस होता. या उपोषणादरम्यान त्यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याची माहिती समोर आली होती. उपोषणाची दखल घेत स्वा. रा. ती. चे अधिष्ठाता डॉ. शकंर धपाटे, अधिक्षक डॉ. राकेश जाधव, भाजपचे नेते नंदकिशोर मुंदडा यांनी उपोषणस्थळी भेट देत कोंडीराम पवार यांच्याशी चर्चा केली. या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देत पवार यांनी उपोषणाला स्थगिती दिली आहे.
या बाबत माहिती अशी की, स्वा. रा. ती. रुग्णालयातील ‘सिटी स्कॅन’ मशीन गेल्या वर्षभरापासून बंद आहे, त्यामुळे गोरगरीब रुग्णांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे. या गंभीर प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी आणि रुग्णालय प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप पवार यांनी केला होता. या साठी कोंडीराम पवार यांनी उपोषणाचा मार्ग पत्करला होता. पवार यांच्या उपोषणाची प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी आणि ‘सिटी स्कॅन’ मशीन लवकरात लवकर सुरू करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत होती. दरम्यान, या उपोषणाबाबत स्वा. रा. ती. प्रशासन आज काय भूमिका घेते ? याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले होते. ‘स्वाराती’ प्रशासनाने आज दिलेल्या आश्वासनानंतर कोंडीराम पवार यांनी उपोषणाला स्थगिती दिली आहे.
पुन्हा उपोषण करणार : महिलांनी मांडल्या समस्या
स्वा. रा.ती. प्रशासनाने येत्या पंधरा दिवसात ‘सिटी स्कॅन’ मशीन चालू करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे उपोषण मागे न घेता स्थगित केले आहे. ‘सिटी स्कॅन’ मशीन गोरगरीब रुग्णांसाठी निर्धारित वेळेत चालू झाली नाही तर पुन्हा याच ठिकाणी उपोषण करण्यात येईल, असा इशारा टायगर ग्रुपचे उमेश पोखरकर यांनी दिला आहे. उपोषणाच्या चर्चेत महिलांनी ‘स्वाराती’ च्या विविध समस्या मांडल्या. या देखील समस्या तातडीने सोडविण्यात येतील, असेही आश्वासन डॉ. शकंर धपाटे आणि डॉ. राकेश जाधव यांनी दिले आहे. उपोषणाच्यावेळी टायगर ग्रूपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


