टीम AM : अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे हवालदील झालेल्या बाधितांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी प्रशासनाने कसलीही सबब न सांगता दिवाळीपूर्वी सबंधितांच्या खात्यात मदतीचे पैसे तातडीने जमा करण्याचे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील आपत्तीग्रस्त भागातील मदत वाटपाचा आढावा घेण्यात आला. राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान 22.69 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून बाधिताना मदतीसाठी 2215 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच सप्टेंबरमध्ये झालेली अतिवृष्टी आणि पुरामुळे 33 जिल्हयातील सुमारे 42 लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे नुकसान झाले असून त्यापैकी सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, हिंगोली, बुलढाणा अमरावती, वर्धा आणि रत्नागिरी या आठ जिल्ह्यातील 5.98 हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
यंदाच्या पावसाळ्यात एकूण 68.69 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून उर्वरित जिल्हयातील पंचनामे सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच ऑगस्ट पर्यंत झालेल्या नुकसानीपोटी मंजूर करण्यात आलेल्या 2215 कोटी रुपयांच्या निधीपैकी सुमारे 1700 कोटी रुपयांचे वाटप झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.



