मराठवाड्यात ‌पावसाचा ‘हाहाकार’ ‌: 75 मंडळात अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत, बचाव कार्य सुरु

बीड जिल्ह्यात ‌आज शाळा – महाविद्यालयांना सुट्टी

टीम AM : मराठवाड्यात पावसाचा कहर सुरुच असून सोमवारी आलेल्या अहवालानूसार विभागातील 75 मंडळात अतिवृष्टी झाली. यामुळे अनेक ठिकाणी नद्या- नाल्यांना पूर आला. अतिवृष्टीमुळे तीन जणांचा मृत्यू झाला तर 76 जनावरे दगावल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका धाराशिव पाठोपाठ बीड, जालना जिल्ह्यांना बसला असून छत्रपती संभाजीनगरातील आठ गावांचा संपर्क तुटला आहे. तर धाराशिव जिल्ह्यातील पुरात अडकलेल्या सुमारे 200 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. 

‘एनडीआरएफ’, लष्कराचे पथक बचाव कार्य करत आहेत. दरम्यान, मराठवाड्यात आतापर्यंत 18 लाखांहून अधिक हेक्टरवरील पिके पाण्यात गेली आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यावरच नेमका नुकसानीचा आकडा समोर येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘या’ मंडळात अतिवृष्टी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बालानगर, नांदर, बिडकीन, पैठण, पाचोड, विहामांडवा, आपेगाव, गोळेगाव , उंडणगाव या मंडळात अतिवृषटी झाली. जालना जिल्ह्यातील जालना शहर, शेवली, रामनगर, पचनवडगाव, जामखेड, रोहिलागड, सुखापुरी, बदनापूर, शेलगाव, रोशनगाव या मंडळाता समावेश आहे. तर बीड जिल्ह्यातील राजुरी, पेंडगाव, मांजरसुंबा, चौसाळा, नेकनूर, लिंबागणेश, येळंबघाट, चारठा, परागाव सिरस, पाटोदा, अलमनेर, ढवळावडगाव, धामणगाव, धानोरा, डोईठाण, दादेगाव, गेवराई, धोंडराई, उमापूर, चकलांबा, रेवकी, तलवाडा, धारूर, शिरूर, रायमोह, तींतरवाणी, ब्रम्बनाथ येळंब, गोमलवाडा, खालापुरी या मंडळात अतिवृष्टी झाली आहे.

शाळा – महाविद्यालयांना सुट्टी

बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील नदी – नाले ओसंडून वाहत असून, शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाच्या वाढत्या धोक्यामुळे आणि पूरस्थितीमुळे बीड जिल्ह्याचे ‌जिल्हाधिकारी विवेक जॉनसन यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आज दिनांक 23 सप्टेंबर मंगळवार रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.