अंबाजोगाईकरांच्या जिल्हा निर्मितीच्या आशा पुन्हा पल्लवीत
टीम AM : राज्यात नवीन तालुके आणि जिल्हे होण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा पेव फुटले आहे. राज्यात तब्बल 81 तालुके आणि 20 नवे जिल्हे बनवले जाणार असल्याचा प्रस्ताव सरकारकडे आलाय. नवीन जिल्हे कधी होणार ? सरकार कधी घोषणा करणार ? याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज चंद्रपुरात माहिती दिली.
दरम्यान, मंत्री बावनकुळे यांच्या विधानानंतर नागरिकांमध्ये कोणते नवे जिल्हे होणार ?, याबाबत चर्चा सुरू झाली असून अंबाजोगाईकरांच्या जिल्हा निर्मितीच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. बीड जिल्ह्याचे विभाजन करुन अंबाजोगाई जिल्हा करावा, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून शासनदरबारी धूळखात पडली आहे.
दरम्यान, सरकार समोर प्रस्ताव आहे, त्यावर निर्णयही घेतला जाणार आहे, पण जनगणनेचा अहवाल आला तर नवीन जिल्ह्यांबाबत निर्णय होईल, असं स्पष्टीकरणही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय. सरकारसमोर नवीन 20 जिल्हे आणि 81 तालुके करण्याचा प्रस्ताव आलाय. परंतू, मात्र जोपर्यंत 2021 ची जनगणना होत नाही आणि त्याचा तपशील येत नाही, तोपर्यंत त्यावर निर्णय होणार नसल्याचं बानवकुळे यांनी सांगितले आहे.



