टीम AM : योगेश्वरी देवल कमिटीच्या माजी विश्वस्त मंडळाने अल्पावधीतच पारदर्शक कारभारातून भाविक – भक्तांचा विश्वास संपादन केला होता. विविध उपक्रम राबवून भाविक -भक्तांची मने जिंकली होती. भाविक – भक्तांना सुविधा, मंदिर परिसर विकास आणि जिर्णोद्धारासाठी प्रयत्न ही सुरू केले होते. पण, ज्या विश्वस्तांवर लेखापरीक्षक, तहसीलदार व आयकर विभाग यांनी गंभीर आक्षेप घेतले होते. त्यांनाच पुन्हा एकदा विश्वस्त म्हणून नेमण्यात आले आहे. हे चुकीचे आहे व ज्यांनी चांगले काम केले त्यांना मात्र वगळण्यात आले, हे धक्कादायक आहे. या आश्चर्यकारक बदलांमागे सर्वोच्च राजकीय दबाव व प्रचंड आर्थिक व्यवहार करून नविन विश्वस्त मंडळ नेमले आहे, अशी योगेश्वरी देवीच्या भाविक – भक्तांमध्ये चर्चा होत असल्याची माहिती माजी विश्वस्तांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे.
योगेश्वरी देवल कमिटीच्या माजी विश्वस्तांनी आज पत्रकार भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत माजी सचिव अशोक लोमटे यांनी गंभीर आरोप केले आहेत. योगेश्वरी देवी मंदिराच्या विकासासाठी तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत दीड कोटी रुपायांचा निधी आला होता. परंतू, तो निधी आमदार समर्थकांनी मंदिराच्या कामासाठी न वापरता खाजगी कामासाठी वापरला असल्याचे त्यांनी नमूद केले. योगेश्वरी देवीच्या मंदिरासाठी भक्तांनी दिलेली दान स्वरुपातील रक्कम तत्कालीन कार्यालय प्रमुखांनी बॅंकेत भरलीच नाही, ती रक्कम लाखांच्या घरात आहे. त्याच्या सर्व नोंदी कार्यालयात उपलब्ध असल्याचेही प्रा. अशोक लोमटे यांनी सांगितले. ज्यांना मंदिराच्या पायऱ्या चढता येत नाहीत, अशा लोकांना देवल कमिटीत स्थान दिले असून एकाच घरातील दोन व्यक्तिंना कमिटीत घेऊन नवा पायंडा पाडला आहे. योगेश्वरी देवल कमिटी ‘प्रायव्हेट प्रॉपर्टी’ आहे का ? असा सवालही लोमटे यांनी उपस्थित केला.
पत्रकार परिषदेत प्रा. अशोक लोमटे यांनी त्यांनी केलेल्या कार्याचा लेखाजोखा मांडत आम्ही यापुढे नवीन विश्वस्त मंडळाच्या निवडीला कायदेशीर आव्हान देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता परत योगेश्वरी देवल कमिटीच्या निवडीचा वाद कोर्टात जाणार आहे. या पत्रकार परिषदेला माजी सचिव प्रा. अशोक लोमटे, राजपाल भोसले, सतीश लोमटे, अमोल लोमटे, अजित चव्हाण, राजेभाऊ लोमटे, रवी कदम आणि श्रीमती संध्या मोहिते उपस्थित होत्या.


