टीम AM : अंबाजोगाई शहरात लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचा वाद चिघळला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या लिंगायत समाज बांधवांनी आज रविवार रोजी अंबाजोगाई नगर परिषदेसमोर मृतदेह ठेवत ठिय्या आंदोलन छेडले.
अंबाजोगाईत गेल्या काही वर्षांपासून लिंगायत समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी मिळावी, अशी मागणी सुरू आहे. मात्र, प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी अद्याप यावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. परिणामी, समाजबांधवांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

आज नगरपरिषदेचे माजी कार्यालयीन अधिक्षक गणपत वाघमारे यांच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला. यावर उपाय न मिळाल्याने संतप्त नागरिकांनी मृतदेह थेट नगर परिषद कार्यालयासमोर आणत आंदोलन सुरू केलं. या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. लिंगायत समाजाच्या बांधवांनी इशारा दिला आहे की, जर तातडीने स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.
माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केली मध्यस्थी
अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनकर्त्या समाजबांधवांची भेट घेतली. याप्रश्नी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांच्याशी बोलून दोन दिवसात तोडगा काढला जाईल असे सांगितले. राजकिशोर मोदी यांच्यावर विश्वास ठेवून आंदोलनकर्त्या समाजाने आंदोलन स्थगित करून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.