टीम AM : ‘स्वाराती’ रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसूतीनंतर जिवंत नवजात बाळाला मृत घोषित केलं आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत ‘स्वाराती’ प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात एका बाळाला जन्मानंतर मृत घोषित करण्यात आले होते. बाळाची योग्यरित्या तपासणी न करता हा निर्णय घेण्यात आला होता. कुटुंबियांनी बाळाला घरी आणले, जिथे अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. याचवेळी बाळ अचानक रडू लागले. बाळाचे रडणे ऐकून कुटुंबियांना सुखद धक्का बसला आणि त्यांनी तातडीने बाळाला पुन्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या बाळावर उपचार सुरू आहेत.
या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने दोन समित्यांची नियुक्ती केली आहे. एका समितीमध्ये संबंधित विभागाचे विभागप्रमुख आहेत, ज्यांना तात्काळ चौकशी करून अधिष्ठातांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
दुसरी समिती इतर विभागांमधील प्राध्यापक आणि विभागप्रमुख अशा पाच लोकांची आहे, त्यांनाही या घटनेची चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. आम्ही स्वतःहून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन कमिट्या तयार केलेल्या आहेत,’ असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.