टीम AM : नागपूर – गोवा ‘शक्तिपीठ’ महामार्गाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट आहे. हा महामार्ग आम्ही करणार आहोत. याबाबत जे अडचणीचे मुद्दे आहेत. त्यावर चर्चेतून मार्ग काढला जाईल. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सांगलीपर्यंतची 60 ते 70 टक्के जमिनी कोणत्य़ाही अडथळ्याशिवाय मिळालेली आहे. 20 ते 30 टक्के जागेसाठी चर्चा करावी लागेल. शेतकऱ्यांच्या शंका दूर केल्या जातील. कोल्हापूरसंदर्भात जी अलायनमेंट आहे. त्याबद्दल लोक आम्हाला भेटून जमिनी घ्या म्हणून सांगत आहेत. त्याबद्दल निवेदने देत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्य सरकारचा ‘शक्तिपीठ’ महामार्ग हा महत्वकांक्षी प्रकल्प असून हा महामार्ग अंबाजोगाईतून जाणार आहे.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, शक्तिपीठ महामार्ग हा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या इगो समाधानासाठी करण्यात येणार नाही. हा महामार्ग मराठवाडा आणि राज्यातील सर्व दुष्काळी जिल्ह्यांसाठी वरदान ठरणार आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटनांतून रोजगाराची निमिर्ती होणार आहे. महामार्गाच्या 100 किलोमीटरच्या अंतरात 500 ते 1000 शेततळे तयार करणार आहोत. नाल्यावर बंधारा निर्माण करणार आहोत. त्यामुळे जलसंवर्धनाचे काम हा महामार्ग करेल. मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रीन हायवे मुळे दुष्काळी भागाला मदत होणार आहे. महामार्गाला पाठिंबा देणाऱ्या सर्वांनाही आम्ही चर्चेसाठी वेळ देऊ आणि विरोध करणाऱ्या लोकांचेही आम्ही ऐकून घेऊ, असे फडणवीस म्हणाले.
‘ही’ देवस्थाने जोडली जाणार
केळझरचा गणपती, कळंबचा गणपती, सेवाग्राम, पोहरादेवी, माहूरगड शक्तीपीठ, तख्त सचखंड गुरुद्वारा, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, अंबाजोगाई शक्तिपीठ, तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, सांगलीतील औदुंबर दत्त मंदिर, नरसोबाची वाडी, जोतिबा देवस्थान, महालक्ष्मी मंदिर, संत बाळूमामा यांचे समाधिस्थान आदमापूर, कुणकेश्वर आणि पत्रादेवी ही देवस्थाने जोडली जाणार आहेत.