टीम AM : अंबाजोगाई शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वाघाळा पाटीजवळ अपघाताची घटना घडली आहे. कार – ॲपेच्या झालेल्या भीषण अपघातात एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. संभाजी नारायण वाघमारे [वय – 60 वर्ष] रा. कुंबेफळ, ता. अंबाजोगाई असं मयत झालेल्या वृद्धाचं नाव आहे. या अपघातात 7 जण जखमी झाले असून त्यांच्यावर ‘स्वाराती’ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ गावातील मयत संभाजी नारायण वाघमारे यांच्यासह अन्य काही जण लग्न समारंभासाठी चनई या गावी गेले होते. लग्न समारंभ उरकून ते कुंबेफळ या गावी रिक्षाने परत जात असताना वाघाळा पाटीजवळ कार क्रमांक एमएच 26 सीपी 2916 आणि ॲपे रिक्षा क्रमांक एमएच 24 ई 5904 यांची समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात संभाजी नारायण वाघमारे यांचा मृत्यू झाला तर अन्य 7 जण जखमी झाले.
जखमींवर ‘स्वाराती’ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, संभाजी नारायण वाघमारे यांच्या मृत्यूमुळे कुंबेफळ गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हा अपघात दिनांक 30 मार्च रविवार रोजी रात्री 9 च्या सुमारास झाला. या घटनेचा अधिक तपास अंबाजोगाई ग्रामीण पोलीस करीत आहेत.