टीम AM : दलित – सवर्ण हा संघर्ष आपल्या समाजात वर्षानुवर्षे सुरूच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानातून दलितांना न्याय मिळेल अशी तरतूद केली होती. परंतु हजारो वर्षांपासून जातीपातींमध्ये अडकलेला समाज त्यातून बाहेर पडलेला नाहीये. त्यामुळे दलितांना, बहुजन समाजाला रास्त न्याय मिळावा म्हणून काही संगठना उभ्या राहिल्या. बहुजन समाजातील प्रत्येक संघटनेच्या जडणघडणेचा संघर्ष दर्शविणारा चित्रपट येऊ घातलाय ज्याचं नाव आहे, ‘जयभीम पँथर – एक संघर्ष’. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट येत्या 11 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
भदंत शीलबोधी थेरो यांच्या नवयान ड्रीम फिल्म प्रॉडक्शन अंतर्गत निर्माण झालेला हा चित्रपट समाजात परिवर्तन घडवणाऱ्या संघटनांच्या ध्येय, वाटचाल आणि संघर्षावर आधारित आहे. समाजात अनेक संघटना अन्याय आणि शोषणाविरोधात लढा देत असतात. या लढ्यांमध्ये येणाऱ्या अडचणी, संघर्ष, आणि परिवर्तनाच्या दिशेने उचललेली पावले यांचे वास्तवदर्शी चित्रण या चित्रपटात पहायला मिळेल.
नवयान ड्रीम फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत आणि निशांत नाथाराम धापसे लिखित – दिग्दर्शित ‘जयभीम पँथर – एक संघर्ष’ हा चित्रपट असून रामभाऊ तायडे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी आणि समाजाला नवीन दिशा देण्यासाठी हा चित्रपट महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असे निर्माते सांगतात. निशांत धापसे यांची कारकीर्द उल्लेखनीय असून त्यांनी यापूर्वी ‘हलाल’, ‘भोंगा’, ‘भारत माझा देश आहे’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचं लेखन केलं आहे, तसेच ‘अंकुश’ आणि ‘रंगीले फंटर’ यांसारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यांच्या कलाकृतींना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
‘जयभीम पँथर – एक संघर्ष’ मध्ये गौरव मोरे, चिन्मय उदगीरकर, मिलिंद शिंदे, अभिजीत चव्हाण, सोनाली पाटील, शशांक शेंडे, जयवंत वाडकर, संजय कुलकर्णी, प्रवीण डाळिंबकर, विनय धाकडे आणि प्रियांका उबाळे यांसारखे अनुभवी आणि लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसतील.