लोकप्रतिनिधींनी केले दुर्लक्ष : जनतेतून तीव्र संताप
टीम AM : गोरगरीब रुग्णांसाठी संजीवनी ठरलेल्या ‘स्वाराती’ रुग्णालयात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या वर्षभरापासून रुग्णालयात 8 कोटींची ॲन्जोग्राफी व ॲन्जोप्लास्टीची मशीन धूळखात पडली आहे. ‘स्वाराती’ प्रशासनाची उदासीनता याला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. ॲन्जोग्राफी व ॲन्जोप्लास्टीची मशीन रुग्णालयात कार्यान्वित झाल्यास मोठ्या प्रमाणात रुग्णांना दिलासा मिळणार आहे. परंतू, लोकप्रतिनिधींनीही याकडे दुर्लक्ष केल्याने गोरगरीब रुग्णांना मात्र उपचारापासून वंचित रहावे लागत आहे. रुग्णालयात ही मशीन तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी सामान्य जनतेतून करण्यात येत आहे.
‘स्वाराती’ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात गोरगरीब रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य सरकारकडून करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून गेल्या वर्षी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागानं 8 कोटींची ॲन्जोग्राफी व ॲन्जोप्लास्टीची मशीन रुग्णालयाला उपलब्ध करुन दिली. या मशीनची इन्स्टॉलेशन प्रकिया देखील पूर्ण झाली असून केवळ डॉक्टर्स् आणि टेक्निशियन अभावी ही मशीन रुग्णालयात धूळखात पडून आहे. रुग्णालयात ही मशीन कार्यान्वित झाल्यास हृदयरोगाचे निदान व उपचार करण्यास मदत होणार आहे.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
‘स्वाराती’ रुग्णालयात दिवसेंदिवस रुग्णांचा ओढा वाढत आहे. या ठिकाणी ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येत असतात. परंतू, या ठिकाणी मिळणाऱ्या तुटपुंज्या आरोग्य सुविधा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. सोनोग्राफी, सीटी स्कॅन मशीन यासह अन्य सुविधांसाठी रुग्णांना झगडावे लागत आहे. यातच आता ॲन्जोग्राफी व ॲन्जोप्लास्टीची मशीन रुग्णालयात उपलब्ध असूनही रुग्णांना त्याचा काहीच उपयोग होताना दिसून येत नाही. याकडे लोकप्रतिनिधींनीही साफ दुर्लक्ष केल्याने जनतेतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. ही मशीन रुग्णांसाठी तातडीने सुरु करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
काय आहे ॲन्जोग्राफी ?
हृदयरोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. हृदयविकार हा वयाच्या कोणत्याही टप्प्यावर येवू शकतो. डॉक्टरांना वाटत असल्यास की एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक येण्याची शक्यता आहे तर ते त्याची ॲन्जोग्राफी करण्यास सांगतात. ॲन्जोग्राफीमध्ये रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आहेत का ? ब्लॉकेजेस कुठे व किती आहेत. या सगळ्या गोष्टी ॲन्जोग्राफीमध्ये समजतात. तसेच ब्लॉकेजेसची स्थिती समजते. रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी आहे की नाही याचे नक्की निदान यामध्ये सापडते. ही ॲन्जोग्राफी करण्यासाठी खाजगी रुग्णालयात भरमसाठ फी आकारली जाते.