कारवाईचा बडगा : बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 सदस्यांचे सदस्यत्व रद्द, वाचा…

टीम AM : बीड जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायतींच्या सदस्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जिल्ह्यातील 13 सरपंच तर 418  सदस्यांचे सदस्यत्व रद्द केलेत. जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत. या आदेशाने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठीच्या राखीव असलेल्या जागांवर निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीस जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र निवडून आलेल्या दिनांकापासून बारा महिन्यांच्या कालावधीत सादर करणे आवश्यक आहे. मात्र 2020 पासून पुढे झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकीमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या अनेक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आष्टी, अंबाजोगाई, वडवणी, पाटोदा, माजलगाव, केज आणि धारूर तालुक्यातील 413 ग्रामपंचायत सदस्य आणि 13 सरपंचाचे सदस्य रद्द केले आहे.