अभिनंदनीय : खो – खो स्पर्धत भारत ठरला विश्वविजेता, बीडच्या प्रियंकाने रचला इतिहास

टीम AM : भारताने पहिल्या खो – खो विश्वचषकावर नाव कोरत इतिहास घडवला आहे. दिल्लीमध्ये आज (19 जानेवारी) पहिल्या खो – खो विश्वचषकातील महिला गटाचा अंतिम सामना पार पडला. अंतिम सामन्यात भारत आणि नेपाळ समोरसमोर होते. या सामन्यामध्ये बीडच्या प्रियंका इंगळेच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला खो – खो संघाने नेपाळवर 38 गुणांच्या फरकाने विजय मिळवला.

भारतीय महिला खो – खो संघ पहिल्या सामन्यापासूनच वरचढ ठरत होता. पहिल्या सामन्यात महिला संघाने तब्बल 176 गुणांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. अंतिम सामन्यात मात्र भारतासमोर नेपाळचं आव्हान होतं. हे आव्हान स्वीकात महिला संघाने पहिला खो – खो विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे.

अंतिम सामन्यात पहिल्या टप्प्यामध्ये भारतीय महिला संघ आघाडीवर होता. तेव्हा 34 – 0 च्या अंतराने नेपाळचा संघ पिछाडीवर होता. पुढे नेपाळच्या महिला खेळाडूंनी दबाव टाकत गुणसंख्या 35 – 24 वर नेली. दुसऱ्या टप्प्यावर काहीसा वरचढ ठरलेला नेपाळचा संघ तिसऱ्या टप्प्यात मागे पडला. तर भारताच्या लेकींनी पुन्हा आघाडी घेत आणखी 38 गुण मिळवले.

चौथ्या टप्प्यात नेपाळने आक्रमणाला सुरुवात केली. पण भारतासमोर त्यांचा टिकाव लागला नाही. भारतीय संघाने 78 – 40 अशा गुणांच्या फरकाने नेपाळच्या महिला संघावर मात केली आणि पहिल्या खो – खो विश्वचषक जिंकण्याचा बहुमान मिळवला आहे. खो – खो विश्वचषक स्पर्धा जिंकल्याबद्दल भारतीय टीमचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.