टीम AM : सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा काही नेम नाही. अशातच बीड जिल्ह्याचे विभाजन होऊन अंबाजोगाई जिल्हा हा 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी घोषित होणार असल्याचं पत्र हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल होत असलेल्या पत्रकामुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला असून 26 जानेवारी रोजी अंबाजोगाई जिल्ह्याची निर्मिती होणार का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अंबाजोगाई जिल्हा होण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मात्र, अंबाजोगाईसह राज्यातील इतर जिल्ह्यांचेही विभाजन होऊन सुमारे 21 जिल्ह्यांच्या निर्मितीची मागणी आहे. त्यामुळे सोशल मीडियावर 26 जानेवारी रोजी अंबाजोगाईसह राज्यात अनेक जिल्ह्यांची निर्मिती होणार असल्याचं हे पत्र नागरिकांना संभ्रमात टाकत आहे. मात्र, सदर पत्रकात कुठलीही वस्तुनिष्ठता नसून याबाबत शासनाकडूनही कुठलेही आदेश हे पारित झालेले नाहीत. त्यामुळे 26 जानेवारी रोजी जिल्ह्याची निर्मिती होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सदर व्हायरल होणारे पत्र हे शासनाचे पत्रक नसून शासनाकडून जिल्हा निर्मितीबाबत कुठलेही आदेश नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून केवळ ही अफवा असल्याचेही स्पष्ट झाले आहे.