टीम AM : मराठवाड्यातील शांतताप्रिय शहर म्हणून अंबाजोगाई शहराची ओळख आहे. पण ही ओळख जवळपास पुसून गेली असून शहरात दररोज कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या घटना सर्रास घडत आहेत. परवा रात्री तर एका व्यापाऱ्याला काही जणांनी अडवून बेदम मारहाण केली. ही घटना ताजी असतानाच मोरेवाडी परिसरातील माऊलीनगर येथे एकाने आज 17 जानेवारी शुक्रवार रोजी सकाळी हवेत गोळीबार केला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. या सिनेमा स्टाईल राड्याच्या घटनेमुळे अंबाजोगाईत चाललयं तरी काय ? अशी भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करित आहेत.
अंबाजोगाई शहरातील शासकीय विश्रामगृह परिसरात परवा रात्री एका व्यापाऱ्याला अडवून काही जणांनी बेदम मारहाण केली. या घटनेत सदरील व्यापारी गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी तपासाचे चक्र फिरवीत काही जणांना ताब्यात घेतले असून यातील सर्व आरोपी हे अल्पवयीन असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर दुसरीकडे आज सकाळी मोरेवाडी परिसरातील माऊलीनगर येथे एका युवकाने हवेत गोळीबार केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरच हादरुन गेला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेत घटनेचा पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. युवकाने गोळीबार का केला ? याचे कारण अद्याप समोर आले नसून पोलीस घटनेचा कसून तपास करीत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे अंबाजोगाई शहराची पुढील वाटचाल कशी राहणार याची चाहूल लागली आहे. अंबाजोगाई शहरात घडलेल्या या घटनेला पोलीसांनी गांभीर्याने घेतले असून शहरात कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. दरम्यान, अंबाजोगाई शहरात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या या घटनांना आळा घालण्यासाठी अंबाजोगाईकरांनीही आत्मचिंतन करण्याची गरज आहे, तरच अंबाजोगाईतील सर्वसामान्य माणूस मोकळा श्वास घेऊ शकेल.