टीम AM : ‘सिलसिला’ या चित्रपटाचा विषय निघाला की आपल्याला काय आठवतं ? तर अमिताभ – रेखाचा रोमान्स, यश चोप्रांचं कमालीचं दिग्दर्शन आणि शिव हरींच्या संगीताने नटलेली अविस्मरणीय गाणी ! मुळातच सुंदर असलेल्या काव्याला ‘यश चोप्रा’ नावाचा परीसस्पर्श झाला आणि ही गाणी अजरामर झाली. आजही देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए… हे गाणं ऐकलं की डोळ्यापुढं उभं राहतं एक सुंदर स्वप्न… केस मोकळे सोडलेली, बोलक्या डोळ्यांची रेखा, तिला मिठीत घेऊन चालणारा अमिताभ, ॲमस्टरडॅमचा निसर्ग, धुकं आणि ‘दूर तक निगाह में..’ भरून राहणारी ट्युलिपची रंगीबेरंगी फुलं…
‘देखा एक ख्वाब.’ हे गीतकार जावेद अख्तर यांचं पहिलं गाणं. जावेद साहेबांनी सलीम साहेबांबरोबर ‘जंजीर’, ‘दीवार’, ‘शोले’ आणि ‘त्रिशूल’ सारख्या सुपरहिट चित्रपटांच्या एकाहून एक सरस पटकथा आणि संवाद लिहिले होते. ही जोडी तुटल्यावरही जावेद साहेब स्वतंत्रपणे पटकथा आणि संवाद लेखन करत होते. 70 च्या दशकात त्यांनी शायरी करायला सुरुवात केली; पण ती स्वतःपुरतीच मर्यादित होती. जावेद साहेब कविताही करतात, हे अगदी जवळच्या काही लोकांना माहीत होते. यश चोप्रा त्यापैकी एक होते. पटकथा संवाद लेखक म्हणून यशस्वी झालेल्या जावेद साहेबांना यश चोप्रांनीच गीतकार बनवले.
झाले असे की, यशजी ‘सिलसिला’ वर काम करत होते, जी एका कवीची प्रेमकथा होती. हा कवी (अमिताभ बच्चन) त्याच्या प्रेयसीच्या (रेखा) प्रेमात अखंड बुडालेला असतो. काही कारणांमुळे त्याचा विवाह दुसऱ्या स्त्रीशी (जया बच्चन) होतो. त्याचे आपल्या प्रेयसीवरचे प्रेम लग्नानंतरही कायम राहते. चित्रपटात नावीन्य आणण्यासाठी या पात्रांच्या कविता आणि त्यावर चित्रित होणारी गाणी एका नव्या कवीकडून लिहून घ्यावी, असे यश चोप्रा यांना वाटत होते. त्यातच एक दिवस ते जावेद अख्तर यांना भेटायला गेले. बोलता बोलता ‘सिलसिला’ चा विषय निघाला. ‘सिलसिला’ साठी जावेद साहेबांनी गाणं लिहावं, असं यशजींना वाटलं आणि त्यांनी जावेद साहेबांना तशी विचारणाही केली. चोप्राजींनी जावेद साहेबांना सांगितले की, ‘या चित्रपटाचा नायक कवी आहे. त्याच्यावर चित्रित केलेले गाणे थोडे वेगळे हवे आणि त्यासाठी नवीन शायरी लिहिली जावी अशी माझी इच्छा आहे.’ पण
जावेद साहेब म्हणाले, ‘तुम्ही दुसरा एखादा गीतकार निवडा. स्क्रिप्ट आणि डायलॉग लिहिण्यात माझा हातखंडा आहे. मी चित्रपटासाठी गाणी कधीच लिहिली नाहीत. काही कविता लिहिल्या आहेत, पण आजतागायत कुठेही त्या प्रसिद्ध झाल्या नाहीत, वाचल्याही गेल्या नाहीत. मग मी गाणं कसं लिहू ?’
जावेद साहेबांनी नकार दिला, तरी यशजी आपल्या आग्रहावर ठाम राहिले. ते त्यांचा पाठपुरावा करतच राहिले. यश चोप्रा आणि जावेद अख्तर यांचे खूप चांगले संबंध होते. त्यामुळे त्यांचा नकार फार काळ टिकला नाही. यशजींचा आपल्यावर इतका विश्वास आहे, त्यामुळे आपणही प्रयत्न करून बघू, असे जावेद साहेबांनी ठरवले. त्यांचा होकार येताच यशजींनी त्यांना शिव – हरींनी रचलेली चाल पाठवली आणि गाण्याची सिच्युएशनही सांगितली. त्यावर जावेद अख्तर यांनी अतिशय विचारपूर्वक गाणे लिहिले आणि ‘देखा एक ख्वाब..’ तयार झाले. त्यानंतर गीतकार म्हणून जावेद साहेबांची कारकीर्द सुरू झाली आणि ‘तेजाब’, ‘ताल’, ‘रिफ्युजी’, ‘लगान’, ‘स्वदेस’, ‘रॉक ऑन’, ‘लक्ष्य’, ‘जिंदगी मिलेगी ना दोबारा’ यांसारख्या चित्रपटांबरोबर ती अधिकाधिक बहरतच गेली.
‘देखा एक ख्वाब.’ हे गाणं लतादीदी आणि किशोरदांच्या आवाजात रेकॉर्ड झालं, तेव्हा स्टुडिओत असलेल्या सर्वांनी ते सुपरहिट होणार, अशी प्रतिक्रिया दिली होती. आणि झालेही तसेच. ‘सिलसिला’ प्रदर्शित होऊन 40 वर्षांहून अधिक काळ लोटला, पण आजही हे सदाबहार गाणं ऐकलं की प्रत्येक जण स्वप्नांच्या दुनियेत हरवून जातो.
लेखिका : प्रा. प्रज्ञा पंडित