लोकप्रतिनिधींनी केलं दुर्लक्ष : अंबाजोगाईकरांचा संताप
टीम AM : अंबाजोगाई शहरातील रस्ते जरी चकाचक होत असले तरी मराठीचे आद्यकवी मुकुंदराज यांच्या समाधीकडे जाणाऱ्या रस्त्याची पुर्ण वाट लागली आहे. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा ? असा प्रश्न भाविकांना पडला आहे. रस्ता रुंदीकरणाचे आणि दुरुस्तीचे काम लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने अत्यंत संथ गतीने चालू असल्याने भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या रस्त्याचे काम वेगाने सुरु करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
मराठी भाषेचे आद्यकवी मुकुंदराज यांची आणि पासोडीकार दासोपंत यांच्या समाधीकडे जाणारा एकच रस्ता आहे. या दोन्ही समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची रेलचेल नेहमी या रस्त्यावर असते. मुकुंदराज यांची समाधी निसर्गरम्य अशा वातावरणात असल्यामुळे अंबाजोगाई शहरात योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आलेले भाविक आवर्जून या समाधीस्थळाला भेट देतात. परंतू, या समाधीस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्ता जागोजागी उघडल्याने आणि रस्त्यावर खड्डे पडल्याने चालताना आणि वाहनं चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याचा त्रास मात्र भक्तांना आणि या रस्त्यावरून जाणाऱ्या ग्रामस्थांना सोसावा लागत आहे. लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने गेल्या कित्येक दिवसांपासून या रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’ अशीच राहिली आहे.
मुकुंदराज यात्रा : भाविकांची नाराजी
मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुकुंदराज समाधी परिसरात यात्रा भरते. कालपासून ही यात्रा भरली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या यात्रेत पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होतात. लहान मुलं, महिला आणि वयोवृद्ध माणसं आजही या यात्रेत सहभागी होत जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसतात. परंतू, यंदा मात्र या यात्रेत जाताना रस्त्याच्या प्रश्नांवरून अनेकांनी उघड लोकप्रतिनिधींवर नाराजी व्यक्त केली. रस्त्याच्या कामासाठी निधी आणायची जबाबदारी लोकप्रतिनिधींनी घेतली पण तो रस्ता पुर्ण करायची जबाबदारी जनतेनी घ्यायची का ? असा सवाल अंबाजोगाईकरांनी उपस्थित केला आहे. मुकुंदराज समाधी स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था तातडीने दूर करावी, अशी मागणी सामान्य जनतेतून करण्यात येत आहे.