टीम AM : विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या दोन ते चार वर्षांपासून प्रशासकांच्या हाती आहेत. 29 महागनरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांचे काम प्रशासकांकडे आहे. सुरुवातीला करोना, प्रभाग रचना आणि नंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यामुळे या निवडणुका लांबलेल्या आहेत. पण आता, काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची शक्यता असल्याने तयारीच्या दृष्टीने राजकीय पक्षांनी चाचपणी सुरू केलीय.
नागपुरात भाजप कार्यकत्यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात मोठे विधान केले आहे.
विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर भारतीय जनता पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे गत पावणेतीन वर्षांपासून राज्यातील अनेक निवडणुका रखडल्या असून, राजकीय पक्षांना 22 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांवरील सुनावणीची प्रतीक्षा आहे. मात्र, प्रत्यक्षात 4 जानेवारी रोजीच सुनावणी होण्याची शक्यता असून, तीन महिन्यांत निवडणुका व्हायला हव्यात, असा प्रयत्न असल्याचे वकतव्य करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकांबाबत संकेतच दिले आहेत. यावेळी विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री पंकजा मुंडे, रणधीर सावरकर, प्रदेश उपाध्यक्ष संजय भेडे, ॲड. धर्मपाल मेश्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.