टीम AM : मानवतेला काळीमा फासणारी घटना आज केज तालुक्यात समोर आली आहे. होळ – आडस रस्त्यावर एक तीन महिन्यांचं बाळ आढळून आले आहे. हे बाळ कोणी टाकून गेले ? हे अद्याप समोर आले नसून सदरिल बाळाला काही धोका होऊ नये म्हणून अंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, होळ – आडस रस्त्याच्या कडेला ऊसाच्या शेतात आज दिनांक 23 डिसेंबर सोमवार रोजी एक तीन महिन्यांचं पुरुष जातीचे बाळ कोणीतरी कपड्यात गुंडाळून टाकून दिले. एवढ्या थंडीत आणि सकाळी हे बाळ नेमकं कुणी टाकलं ? हे अद्याप समोर आले नाही. हा प्रकार जेव्हा समोर आला तेव्हा स्थानिक शेतकऱ्यांनी तातडीने युसुफ वडगाव पोलिसांना याची खबर दिली.
युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे एपीआय मच्छिंद्र शेंडगे, पीएसआय राहुल पतंगे, पोलिस हेडकॉन्स्टेबल खेडकर आणि महिला कॉन्स्टेबल गाडेकर यांनी तातडीने ‘त्या’ ठिकाणी धाव घेतली आणि त्या बाळाला ताब्यात घेतले. सदरिल बाळ नेमके कुणाचे आहे ? कुणाला नकोसे झाले आणि ‘त्या’ ठिकाणी कुणी ठेवले ? याचा शोध पोलीस घेतीलच. परंतू, अशा प्रकारची अमानवीय कृती कशी होऊ शकते ? एका निर्दयी माणसाकडूनच अशी कृती होऊ शकते, यांचं ज्वलंत उदाहरण केज तालुक्यात समोर आले आहे. बाळाच्या जीवाला काही धोका निर्माण होऊ नये म्हणून सदरिल बाळाला पोलिसांनी अंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रुग्णालयात दाखल केले आहे. बाळाची प्रकृती आता स्थिर आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे.