अंबाजोगाईत अतिक्रमणांवर पडणार पुन्हा हातोडा : रस्ता रुंदीकरणाचे काम वेगात, वाचा…

टीम AM : अंबाजोगाई शहरात अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा सुरु होणार आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणांचा अडथळा जाणवू लागल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शहरात पुन्हा एकदा अतिक्रमणांवर हातोडा पडणार आहे. तशा आशयाच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने भोंग्याद्वारे शहरातील अतिक्रमण धारकांना देण्यात येत आहेत.‌ सोमवार दिनांक 13 जानेवारी पर्यंत रस्त्यावरील अतिक्रमणे काढली नाहीत तर ती अतिक्रमणे पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात येतील, अशी सूचना देण्यात आली आहे.

अंबाजोगाई शहरातील संत भगवानबाबा चौक ते यशवंतराव चव्हाण चौक तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते – ‘स्वाराती’ रुग्णालय – यशवंतराव चव्हाण चौक या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण होत आहे. यासाठी तब्बल 42 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्याचे कामही सुरु करण्यात आले आहे. परंतू, काम पुर्णत्वास नेण्यासाठी अतिक्रमणांचा अडथळा सार्वजनिक बांधकाम विभागाला होत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण हटाव मोहिम पुन्हा सुरु करण्याचे ठरविले असून त्या दृष्टीने तयारीही सुरू केली आहे. या अगोदर शहरात अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली होती. त्यात बरेच अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आले होते. नंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्याने अतिक्रमण हटाव मोहिम थांबविली होती.‌ 

विधानसभा निवडणूक आता पार पडल्याने पुन्हा एकदा ही अतिक्रमण हटाव मोहिम सुरु होणार आहे.‌ या मोहिमेद्वारे शहरातील अतिक्रमणे काढली जाणार आहेत. दरम्यान, अतिक्रमण हटाव मोहिमे साठी जेसीबी, मोठे क्रेन यासह विविध यंत्रसामग्री आणि पोलिस बंदोबस्ताची पुर्ण तयारी झाली असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.