टीम AM : राज्यात आता थंडीची लाट पसरली आहे. फेंगल चक्रीवादळ तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात पुढील 24 तासांमध्ये तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यात वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. तर जळगाव शहरासह अनेक ठिकाणी तापमानात मोठी घट झाल्याचं दिसून येत आहे.
नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर, जर्कींगच्या वापरासह शेकोट्यां पेटवताना दिसून येत आहेत. अंबाजोगाई शहरासह आसपासच्या परिसरातही थंडीची लाट दिसून येत आहे. सकाळच्या सुमारास दाट धुक्याची चादर परिसरातील डोंगरांवर आणि शेत शिवारांवर पसरत आहे. दिवसभर काहीसे उन्हे जाणवल्यावर पुन्हा सायंकाळच्या सुमारास वातावरणात कमालीचा गारवा जाणवत आहे. कामगार, दुग्ध विक्रेते, शाळकरी विद्यार्थी, शेतमजूर यांना या थंडीचा सर्वाधिक सामना करावा लागत आहे.
पश्चिम महाराष्ट्रासह, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही थंडीत वाढ झाली आहे. पुढील दोन दिवस तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये कडाक्याची थंडीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.