भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा : अडीच वर्षाच्या कार्यकाळावर मी समाधानी, काय म्हणाले शिंदे ? वाचा… 

टीम AM : आम्ही नाराज होऊन रडणारे नाही. आम्ही लढून काम करणारे आहोत. महायुतीला एवढा मोठा विजय मिळाला, त्याची ऐतिहासिक अशी गणना होते. माझ्या शरीरात शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत जनतेची सेवा करेन. मला काय मिळाले त्यापेक्षा महाराष्ट्राला काय मिळाले, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. अडीच वर्षाच्या कार्यकाळावर मी समाधानी आहे, असे सांगून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडत भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा केला.

स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडण्यास तयार नसल्याने एकनाथ शिंदे प्रचंड नाराज असल्याचे बोलले गेले. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून चार दिवस उलटले तरी मुख्यमंत्रिपदावर निर्णय होत नसल्याने सेना – भाजप अशा दोन्ही पक्षांत नाराजी होती. आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा, यासाठी सेना – भाजपचे कार्यकर्ते प्रचंड आग्रही होते. परंतू भाजपकडून एकनाथ शिंदे यांना स्पष्ट निरोप देण्यात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बुधवारी आपली भूमिका स्पष्ट केली.

मी मनमोकळा माणूस आहे. मी काहीही ताणून ठेवलेले नाही. मी मंगळवारी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला होता. सरकार बनविताना माझ्यामुळे अडचण आहे, असे तुमच्या मनात आणू नका. तुम्ही आम्हाला खूप सहकार्य केले, त्यामुळे तुम्ही निर्णय घेऊ शकता. तुमचा निर्णय आम्हाला मान्य असेल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

अडीच वर्षात महायुतीने केलेल्या कामाला यश आले. त्यामुळे लोकांनी विश्वास दाखवला. महाविकास आघाडीने थांबविलेली कामे आम्ही पुढे नेली. दुसरीकडे कल्याणकारी योजनांची आणि विकासाची आम्ही सांगड घातली. त्यामुळे लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला. आम्ही महायुतीच्या लोकांनी सगळ्यांनीच निवडणुकीत प्रचंड काम केले. पहाटेपर्यंत मी काम करायचो. दोन – तीन तास झोपल्यानंतर पुन्हा सभा घ्यायचो. लोकांच्या भेटीगाठी सुरू होत्या. मी प्रचारात 80 ते 100 सभा घेतल्या. प्रवास केला. पायाला भिंगरी लावून काम केले. काल कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आज आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करेन. मुख्यमंत्री नव्हतोच मी कॉमन मॅन म्हणूनच काम केले. सर्वसामान्य जनतेसाठी काही ना काही केले पाहिजे, अशी माझी धारणा होती. मी देखील सर्वसामान्य घरातून आलेलो आहे. माझी परिस्थिती देखील मी भाषणांमधून अनेकवेळा मांडली. त्याचवेळी शेतकरी, महिला, युवक अशांसाठी काम करायचे माझे ठरलेले होते. सत्तेत आल्याबरोबर यासाठी मी काम करणे सुरू केले. त्यामुळे आम्हाला यश मिळाले, असे शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here