टीम AM : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री यांना सोबत घेत राज्यपाल यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे. नवे सरकार स्थापन होईपर्यंत शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री असतील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना भेटून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले. यावेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दीपक केसरकर, दादाजी भुसे आणि चंद्रकांत रघुवंशी हे देखील उपस्थित होते.
माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये : मुख्यमंत्री
‘महायुती’ च्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. ‘महायुती’ म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र, अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी ‘महायुती’ भक्कम होती, आहे आणि यापुढेही भक्कमच राहील, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.