ऑल इंडिया पँथर सेनेचा अंबाजोगाईत ‘जनआक्रोश’ मोर्चा

नितेश राणे विरुद्ध गुन्हा दाखल करा, पीडित मुलीच्या कुटुंबाला न्याय द्या : उपजिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

टीम AM : ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आज दिनांक 10 सप्टेंबर मंगळवार रोजी ‘जनआक्रोश’ मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघून उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी ‘महायुती’ सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच केज तालुक्यातील शाळकरी मुलाला चॉकलेट चोरले म्हणून बांधून मारले. या प्रकरणी बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्याची मागणी करण्यात आली. 

परळी येथील 11 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला. पीडित कुटुंब परळी पोलीस ठाण्यात गेल्यास तक्रार घेतली नाही. या प्रकरणी पालकमंत्री बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. राज्यात होत असलेल्या घटना थांबल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करु, असा इशारा अक्षय भूंबे यांनी दिला आहे. यावेळी जीवन गायकवाड, भैय्या सोनकांबळे यांच्यासह ऑल इंडिया पँथर सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती.