‘कुछ नाले खुद को समंदर समझ बैठे है’ मुंडेंची शायरी अन ‘त्यांना’ इशारा

धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठान आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाचे शानदार उद्घाटन

अभिनेत्री रश्मीका मंदाना व कृती सेनन यांनी जिंकली परळीकरांची मने

गणेशोत्सवातील लोककलांवर टीका म्हणजे संस्कृती व कलाकारांचा अपमान – धनंजय मुंडे

नाथ प्रतिष्ठान प्रत्येकाच्या सुखदुःखाचा सदैव साथीदार – धनंजय मुंडे

टीम AM : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या 19 व्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाचे शानदार उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री पुष्पा फेम रश्मिका मंदांना व आदीपुरुष रामायणातील सीताफेम क्रिती सेनान यांच्या प्रमुख उपस्थिती झाले. यावेळी तमाम परळीकरांना स्मित हास्य देत रश्मिका मंदांना व ‘गणपती बाप्पा मोरया’ चा जयघोष करत अभिनेत्री क्रिती सेनान यांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. तर या व्यासपीठावरून विरोधकांचा खरपूस समाचार घेत धनंजय मुंडे यांनी नाथ प्रतिष्ठानच्या वेळोवेळी केलेल्या सामाजिक दायित्वाची साक्ष उपस्थितांसमोर मांडली.

धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही परळीकरांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी म्हणजेच वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात दिग्गज कलाकारांच्या कार्यक्रमांचे व कला सादरीकरणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाचे शानदार उद्घाटन स्व. पंडित अण्णा मुंडे सहभागृह, जत्रा मैदान, परळी येथे झाले. यावेळी व्यासपीठावर धनंजय मुंडे यांच्यासह नॅशनल क्रश म्हणून ओळख असलेली पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना तसेच आदीपुरुष रामायण चित्रपटातुन देशाच्या घराघरात पोहोचलेली सीतेचा अभिनय अत्यंत उत्कृष्टरित्या केलेली अभिनेत्री क्रिती सेनान या दोघींची प्रमुख उपस्थिती होती. तर या उदघाटन कार्यक्रमाचे निवेदन अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांनी केले.

पहिल्या दिवशी अभिनेता संकर्षण कराडे त्याचबरोबर सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी, तेजा देवकर, ऋतुजा जुन्नरकर, पूनम कुडाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम झाला. या सांस्कृतिक कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद देत टाळ्या, शिट्ट्यांच्या गजरात परळीकर रसिक, प्रेक्षकांनी दाद दिली. कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा अतिशय भव्य दिव्य व नेत्रदीपक अशा पद्धतीने झाला. यावेळी धनंजय मुंडे, राजश्री मुंडे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवर कलाकारांचा नाथ प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला.

एक स्मित हास्य आणि ‘कस काय परळीकर’ म्हणत रश्मिका मंदांनीने जिंकली मने

या कार्यक्रमाच्या उद्घाटिका प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदांना यांनी नाथ प्रतिष्ठानच्या या कार्यक्रमाचे कौतुक करतानाच सर्वांना आपल्या स्मित हास्याने भुरळ घातली. एक स्मितहास्य आणि आपल्या भाषणाची सुरुवात ‘कसं काय परळीकर’ असे मराठीतून म्हणत तिने उपस्थित प्रेक्षकांची मनी जिंकली. तर रामायणातील सीताफेमा अभिनेत्री कृती सेनान यांनी ‘जय श्रीराम’ चा नारा देत ‘गणपती बप्पा मोरया’ असे म्हणत नाथ प्रतिष्ठानने आयोजित केलेला हा महोत्सव सर्वांसाठी एक मेजवानीच असल्याचे म्हणत धनंजय मुंडे यांच्या भव्य आयोजनाचे कौतुक केले.

धनंजय मुंडे यांनी टीकाकारांचा घेतला समाचार : नाथ प्रतिष्ठानच्या सामाजिक दायित्वाची दिली साक्ष

यावेळी बोलताना नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय मुंडे यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षापासून नाथ प्रतिष्ठान अविरतपणे वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक मेजवानी व महाराष्ट्रातील कलाकारांच्या कलेला एक भव्य दिव्य व्यासपीठ निर्माण करून देण्याचे काम करत आहे. मात्र, काही लोकांच्या हे पोटात दुखत असून या कार्यक्रमावरून टीका करण्याचे काम काही जण करत आहेत. राजकारण करताना सांस्कृतिक व सामाजिक चळवळ जपण्याचे काम नाथ प्रतिष्ठानने केलेले आहे. एवढेच नाही तर प्रत्येकाच्या सुखदुःखात एक साथीदार अशी भूमिका नाथ प्रतिष्ठानने वेळोवेळीच निभावली आहे. अनेक नैसर्गिक संकटे असो सामुदायिक विवाह सोहळे असो किंवा कोरोनाचा काळ कोणत्याही कठीण प्रसंगात नाथ प्रतिष्ठान पावला पावलावर प्रत्येकाच्या सुखदुःखात एक खंबीर आधार म्हणून उभे राहिलेले आहे. काल परवाच परळी शहरात झालेल्या पूर परिस्थितीत आपण स्वतः चिखल तुडवत या कुटुंबांची भेट घेतली. पूरग्रस्तांना आवश्यक अन्न, पाणी, निवारा यासह आर्थिक मदतीपर्यंतचे कामही याच नाथ प्रतिष्ठानने केलेले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचे नाव आणि निर्माण झालेली प्रतिमा याला गालबोट लावण्याचा प्रयत्न काही शक्ती जाणीवपूर्वक करत आहेत. मात्र, याला न जुमानता नाथ प्रतिष्ठानचा हा उपक्रम इतर सामाजिक उपक्रमांच्या बरोबरीने अविरतपणे सुरूच राहणार असून या महोत्सवात आयोजित केले जाणारे कार्यक्रम हे सांस्कृतिक व लोककलांचा एक भाग आहे, त्यावर टीका करणे म्हणजे आपल्या संस्कृती व आलेल्या कलाकारांचा अपमान असल्याचे धनंजय मुंडे यांनी ठणकावून सांगितले.

मुंडेंची शायरी अन इशारा

दरम्यान राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागले असून अनेकजण तयारीला लागले आहेत. परळी विधानसभा मतदारसंघात देखील अनेक इच्छुक वेगवेगळ्या पक्षांकडून तयारी करत असून, वेगवेगळ्या अफवा पसरवणे व टीका करण्याचे काम करत आहेत, त्यांना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या खास शैलीत ‘सही वक्त पर करवा देंगे हदो को एहसास, कुछ नाले खुद को समंदर समझ बैठे है’ या खास शायरीतून इशारा दिला आहे. 

यावेळी युवक नेते अजय मुंडे, नाथ प्रतिष्ठानचे कार्यवाह वाल्मिक कराड यांसह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मान्यवर नेते व पदाधिकारी यांसह आदी उपस्थित होते.