‘बत्ती गुल‌ मिटर चालू’ : खंडित वीज पुरवठ्यामुळे अंबाजोगाईकर हैराण

सणासुदीच्या काळात तरी वीजपुरवठा सुरळीत करा : अंबाजोगाईकरांची मागणी 

टीम AM : अंबाजोगाई शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत‌ असलेल्या खंडित वीज पुरवठ्यामुळे ‌शहरवासियांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वीज कधी येईल आणि कधी जाईल ‌याचा काही नेम नाही. दुसरीकडे ‌सातत्याने वीज जात असली तरी वीजेची बीलं मात्र भरमसाठ येत आहेत. त्यामुळे अंबाजोगाईकरांच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मीडियावर देखील दररोज नागरिक ‘महावितरण’ च्या कारभारावर नाराजी व्यक्त करित आहेत.

अंबाजोगाई शहरात रस्त्यांसाठी पोल शिफ्टींगची कामं‌ सुरु आहेत. ही पोल शिफ्टींगची काम‌ करित‌ असताना दररोज अनेक भागात वीजपुरवठा खंडित करावा लागत‌ आहे. परंतू, दिलेल्या निर्धारित वेळेत हे काम पुर्ण होत नसल्याने दीर्घ काळ वीज पुरवठा खंडित करावा लागत आहे. त्यामुळे अंबाजोगाईकरांना त्रास सहन करावा लागत आहे. दुसरीकडे ज्या भागात पोल शिफ्टींगची काम‌ं सुरू नाहीत ‘त्या’ भागातही सातत्याने वीजेचा लपंडाव सुरू आहे. अंबाजोगाई शहरातील काही भागात तर वीजेचा पुरवठा कमी – अधिक प्रमाणात होत असल्याने आणि सातत्याने व्होल्टेज कमी – अधिक होत असल्याने अनेक इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिक उपकरणे जळून खाक झाली आहेत. परंतू, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे.

खंडित वीज पुरवठ्यामुळे ‘पाणी’ ही मिळेना 

अंबाजोगाई शहरात गेल्या अनेक वर्षांपासून आठ ते दहा दिवसाला पाणी पुरवठा होतो. त्यामुळे अंबाजोगाईकर पाणी साठवून ठेवण्यासाठी अधिक कष्ट घेतात. ‘नेमके पाणी यावे आणि वीज जावी’ हा घटनाक्रम सातत्याने अंबाजोगाईकरांसोबत‌ घडत आहे. त्यामुळे ‘वीजही नाही आणि पाणीही नाही’ अशी परिस्थिती शहरात निर्माण झाली असून याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. 

सणासुदीच्या काळात वीज पुरवठा सुरळीत करावा 

अंबाजोगाई शहरात उद्यापासून ‘गणेशोत्सव’ सुरू होत आहे‌. याची तयारी अनेक गणेश मंडळांनी सुरू केली आहे. त्यासोबतच दोन – तीन दिवसांनी लक्ष्मीचा सण आहे. यासाठीही ‌महिला अनेक दिवसांपासून तयारी‌ करित‌ असतात.‌ या उत्सवाच्या काळात ‘महावितरण’ ने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी अंबाजोगाईकरांच्या वतीने करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींनीही अंबाजोगाईकरांच्या भावनांचा विचार करुन याकडे अधिक लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.